मुंबई: अंधेरी पूल दुर्घटना : पावसाने अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं
मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फुटपाथचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. त्या ब्रिजवरील फुटपाथचा काही भाग कोसळला. हा पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.
ब्रिज कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. 5 जण जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे वाहतूक सुरु करणं हे मोठं आव्हान आहे.