Health Identity Card :आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होणार, आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. यादरम्यान कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरु आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मिशनची सुरुवात होत आहे, ज्यामध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे.
जगात कुठेही भारतासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा नाही : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मला आनंद होतोय की, आजपासून आयुषमान भारत डिजिटल मिशन संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आलं आहे. हे मिशन देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांच्या उपचारांत येणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे." पुढे बोलाताना ते म्हणाले की, "130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाईल सब्स्क्राईबर्स, जवळपास 80 कोटी इंटरनेट युजर्स, जवळपास 43 कोटी जनधन बँक खाती एवढं मोठं कनेक्टेड इंफ्रास्ट्रक्चर जगात कुठेच नाहीये. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर रेशनपासून प्रशासनापर्यंत, पारदर्शी पद्धतीनं सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवत आहे."