Zero Hour : 40 हजार कोटींची बिलं थकली, कंत्राटदारांवर आंदोलनाची वेळ
तुम्ही पाहाताय एबीपी माझा. आणि ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजू लागलाय. ही निवडणूक आता अवघ्या महिन्या-सव्वा महिन्यावर आलीय. त्या निवडणुकीच्या तोंडावर सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासनानं लाभार्थी महिलांना पहिल्या तीन टप्प्यांतच तीन हजार तीनशे कोटी रुपयांच्या निधीचं वाटप पूर्ण केलं. त्याची आज पुन्हा आठवण येण्याचं कारण म्हणजे राज्यातल्या शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांकडून उद्या होणारं लाक्षणिक आंदोलन. राज्य शासनाकडून तब्बल चाळीस हजार कोटींची बिलं अद्याप वसूल न झाल्यानं राज्यातील शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात कोट्यवधी रुपयांची विकासकामं करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन विभाग, जलसंधारण विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदी विभागांमधली जवळपास ४० हजार कोटींची कामं करण्यात आली आहेत. पण राज्य शासनाकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या सर्व कामांची देणी चुकती करण्यात आलेली नाहीत. त्यामुळं शासकीय अभियंते आणि कंत्राटदारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. ही बाब वेळोवेळी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळं एक ऑक्टोबरपासून कामं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरही राज्य शासनानं कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शासकीय अभियंते आणि कंत्राटदार उद्या लाक्षणिक आंदोलन करणार आहेत.