Zero Hour IND vs BAN Test Match : कानपूर कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने मालिका जिंकली
तुम्ही पाहताय एबीपी माझा. आणि ब्रेकनंतर झीरो अवरच्या तिसऱ्या सत्रात तुमचं स्वागत. बातमी आहे कानपूरच्या मैदानातून.
रोहित शर्माच्या भारतीय संघानं कानपूरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा निर्भेळ विजय साजरा केला. कानपूर कसोटी सामन्यात जवळपास अडीच दिवसांचा खेळ हा पावसानं वाया गेला होता. त्यामुळं ही कसोटी अनिर्णीत राहिल असा अंदाज होता. पण पहिल्या डावात वेगानं ५२ धावांची आघाडी घेऊन, भारतानं डाव घोषित करण्याचा घेतलेला निर्णय कसोटीला कलाटणी देणारा ठरला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या संघव्यवस्थापनाचा तो निर्णय पाचव्या आणि अखेरच्या दिवशी अचूक ठरवला. त्यांनी चौथ्या दिवशीच्या दोन बाद २६ धावांवरून बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या १४६ धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळं भारतासमोर विजयासाठी अवघं ९५ धावांचं आव्हान होतं. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीनं तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. यशस्वी जयस्वालनं ४५ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं चार चौकारांसह नाबाद २९ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. तो विजय केवळ बांगलादेशवरचा नव्हता, तर वेळ आणि पावसावरही होता. त्यामुळं या विजयासाठी भारतीय संघाला शाबासकी देताना कसोटी दर्जाला साजेशी फलंदाजी आता लुप्त होत चाललीय का, याचाही विचार करायला हवा.
या बातमीसोबत आजच्या झीरो अवरमध्ये इथंच थांबूया. पण उद्या सात वाजून ५६ मिनिटांनी झीरो अवरमध्ये पुन्हा भेटूया. पण बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहात राहा एबीपी माझा.