रॉयटर्सचा छात्राचित्रकार दानिश सिद्दीकीचा मृत्यू, फोटोतून मांडत आला संघर्ष, देशानं हरहुन्नरी पत्रकार गमावला...
काबुल : अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दीकी अफगाणिस्थानमधील सध्याची परिस्थिती कव्हर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्थानात गेले होते. दानिश सिद्दीकी मूळचे दिल्लीतील रहिवाशी होते. अफगाणिस्थानातील स्थानिक वृत्तवाहिनीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली.
दरम्यान, अमेरिकेतील सैनिक परतल्यानंतर अफगाणिस्थानातील परिस्थिती गंभीर झाली आहे. सिद्दिकी देखील हीच परिस्थिती कव्हर करण्यासाठी तिथे गेले होते. सिद्दिकी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर ते फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करु लागले.
दानिश सिद्दीकी यांना 2018 मध्ये त्यांचे सहकारी अदनान आबिदी यांच्यासह पुलित्जर पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते पुलित्जर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. दानिश यांनी रोहिंग्या शरणार्थी प्रकरणही कव्हर केलं होतं.