Maharashtra Politics : राणे, नाईक ते महाडिक... एक घर दोन पक्ष Special Report
आता बातमी आहे राजकारणातल्या अशा बापमंडळींची... जे आधीच सत्ता उपभोगताहेत.. कुणी आमदार आहे तर कुणी खासदार... मात्र तेवढ्यानं त्यांचं समाधान होताना दिसत नाहीय.. आता आपल्या लेकराला देखील सत्तेची खुर्ची मिळावी म्हणून त्यांचा खटाटोप सुरू आहे.. आपल्या पक्षातला कोटा फुल असल्याने त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखांचे उंबरठे झिजवायला घेतलेत... कोण आहे ही मंडळी ज्यांना एकाच घरात दोन पक्ष नांदवायचे आहेत.. राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात
नाईक परिवाराचा उल्लेख केल्याशिवाय नवी मुंबईतल्या राजकारणाची कल्पनाच होऊ शकत नाही. सध्या भाजपानं गणेश नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी जाहीर केलीय.. तर पक्षातीलच प्रतिस्पर्धी मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून तिकीट दिलंय. आता मंदा म्हात्रे यांना आव्हान असणार आहे ते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचं. ते लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. याचा अर्थ वडील गणेश नाईक हे भाजपाचे उमेदवार.. तर त्याच घरात मुलगा संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार... शरद पवारांनी संदीप नाईक यांना आपल्याकडे खेचत मोठा मास्टरस्ट्रोक खेळल्याचं बोललं जातंय. आता नाईकांच्या घरात किती आमदार होतात हे २३ तारखेला पाहुयात
वडील नारायण राणे रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार..
पक्ष भाजप...
धाकटा पुत्र नितेश राणे... कणकवलीचे आमदार
पक्ष भाजपच...
आणि आता थोरला मुलगा निलेश राणेंच्या गळ्यात आमदारकीची माळ पडावी यासाठी खटाटोप सुरू आहे..
पण पक्ष असू शकतो एकनाथ शिंदेंची शिवसेना.. जागावाटपात कुडाळ-मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार असल्याचं कळतंय. मात्र या इथून निलेश राणे इच्छुक असल्यानं राणे पिता पुत्रांनी वर्षा आणि सागर बंगल्याच्या वाऱ्या करायला सुरुवात केली आहे. लवकरच एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी निलेश राणे हाती शिवधनुष्य घेऊ शकतात... आणि तसं झालं तरं राणे घरात दोन पक्ष नांदायला सुरुवात होतील
वेगळ्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायची वेळ आली तरी चालेल..
मात्र सत्तेची सगळी पदं आपल्या घरात यावी यासाठी अनेक नेत्यांचा खटाटोप सुरू आहे.. आणि अशाच नेत्यांच्या यादीमधलं आणखी एक नाव म्हणजे धनंजय महाडिक... धनंजय महाडिकांचे चिरंजीव कृष्णराज हे उत्तर कोल्हापूरमधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे.. आणि त्यासाठी धनंजय महाडिकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. उत्तर कोल्हापूर मतदारसंघ सध्या शिंदेंच्या कोट्यात आहे.. त्यामुळेच वर्षा बंगल्यावर धनंजय महाडिक हे कृष्णराज यांना घेऊन आले होते. आता शिंदेंची कृष्णराज यांच्या हातात धनुष्यबाण देणार का? आणि जर दिलं तर महाडिकांच्या घरावर दोन पक्षाचे झेंडे फडकताना दिसतील