Cyber Fraud : सावध व्हा! पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत सायबर फ्रॉड, तब्बल 16 लाखांना गंडा!
पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पार्ट टाईम जॉबची ऑफर चांगलीच महागात पडली आहे. या जॉबच्या लालसेमुळे एका सायबर स्कॅमर्सने इंजिनिअरचे 16 लाख रूपये लुटले आहेत.
Cyber Fraud : सध्या देशात सातत्याने सायबर क्राईमच्या घटना घटत आहेत. या सायबर स्कॅमर्सकडून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करुन लोकांना लुटले जात आहे. सध्या अशीच एका घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये कमी शिकलेलीच लोक नव्हे, तर उच्चशिक्षित लोकही सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) जाळ्यात अडकत आहेत. सरकारकडून याबाबत वेळोवेळी सावध राहण्याचं आवाहन करुनही लोक फसवणुकीला बळी पडत आहेत. ही सायबर फ्रॉडची घटना पुण्यातील असून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला तब्बल 16 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.
अशी झाली ऑनलाईन फसवणूक!
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पुण्यात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला एका ऑनलाईन अॅपवर पार्ट टाईम जॉबची ऑफर मिळाली होती. हा इंजिनिअर एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. पण अतिरिक्त उत्पन्नाच्या लालसेपोटी त्याने अॅपवर आलेला मेसेज फॉलो करायला सुरूवात केली. या मेसेजच्या माध्यामातून काही सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये सुरुवातीला व्हिडीओज लाईक करा आणि पैसे कमवा, अशी ऑफर देण्यात आली होती. यानंतर इंजिनिअरला वेगवेगळे टास्क देण्यात आले. या प्रत्येक टास्कला इंजिनिअरला पैसेही देण्यात आले. यानंतर सायबर स्कॅमरने वेबसाईटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सांगितले. यामुळे जास्त पैशांची कमाई होईल, असं सांगण्यात आले. ही सूचना फॉलो करुन इंजिनिअरने मोठी रक्कम गुंतवली. या इंजिनिअरने 4 मे पासून ते 8 मे पर्यंतच्या काळात वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल 15.9 लाख रुपये पाठवले. याचं कारण सुरुवातीला गुंतवणूक केल्यामुळे चांगला नफा मिळत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे त्याने गुंतवणूक केली होती. पण जेव्हा इंजिनिअरने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा रक्कम काढता येत नव्हती. यामुळे त्याने संबंधित अॅपवर तक्रारही केली. मात्र यानंतरही इंजिनिअरला अजून रक्कम पाठवण्यासाठी सांगण्यात आले. ही गोष्ट ऐकल्यानंतर इंजिनिअरला समजलं की आपली फसवणूक झाली आहे. यानंतर पीडित इंजिनिअरने पोलीस ठाण्यात जाऊन सायबर स्कॅमर्सच्या विरोधात तक्रार दाखल केली.
फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?
कोणत्याही सायबर गुन्हेगारीला बळी पडायचं नसेल, तर ऑनलाईन जॉब अॅप, वेबसाईट्स अधिकृत आहेत का? हा आधी स्वत:ला प्रश्न विचारा, त्याची पडताळणी करा. तसेच पार्ट टाईम जॉब करा आणि भरपूर पैसे कमवा? अशी ऑफर मिळत असेल, तर सावध व्हा! कारण पैशाचं आमिष दाखवून फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे अधिकृत ऑनलाईल जॉब पोर्टल आणि वेबसाईटवर विश्वास ठेवा. यासोबत कुणालाही बँक डिटेल्स, पत्ता आणि ओटीपी नंबर इत्यादी वैयक्तिक माहिती शेअर करु नका. तसेच इंटरनेटचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी.
वाचा इतर बातम्या :