ChatGPT Disadvantage : ChatGPT मुळे वकिलाला भर कोर्टात व्हावं लागलं अपमानित, वापर करताना 'ही' काळजी घ्या
चॅटजीपीटीमुळे एका वकिलाला भर न्यायालयात अपमानित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ChatGPT चा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
ChatGPT Disadvantage : साधारण गेल्या 8-9 महिन्यापासून OpenAI च्या ChatGPT शी संबंधित नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या तंत्रज्ञानाचा अनेकजण वेगवेगळ्या कामासाठी वापर करत आहेत. यामध्ये तुम्ही तर नाही ना? याचं होय, असं उत्तर असेल तर तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (AI) मदतीने एखादी माहिती गोळा करत असाल, तर त्या माहितीची योग्य पडताळणी करू घ्या. कारण ChatGPT किंवा ChatBoat हे रोबोटिक प्रकारातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी अगदी योग्य माहिती देईल, याची काही खात्री नाही. अशावेळी माणसाच्या मेंदूची किंवा मानवी प्रज्ञेची गरज निर्माण होते ज्यामुळे माहितीची योग्य पडताळणी केली जाऊ शकते. याचं कारण अलीकडेच एका वकिलाशी संबंधित बातमी समोर आली आहे ज्यामध्ये ChatGPT ने चुकीची माहिती दिली आहे. यामुळे वकिलाला भर न्यायालयात अपमानित व्हावं लागले आहे.
वकिलाने केला होता ChatGPT वापर
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमधील एका वकिलाने न्यायालयीन कामाची माहिती शोधण्यासाठी ChatGPT वापर केला होता. या मिळालेल्या माहितीवर वकिलाने विश्वास ठेवून एका केसच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात माहिती सादर केली. यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या केसबाबत न्यायालयाला असे आढळून आले की, वकील आणि त्याच्या फर्मकडून केसशी संबंधित जे संदर्भ दिले आहेत ते कधी अस्तित्वाच नव्हते. न्यायालयाने या घटनेचा 'अभूतपूर्व परिस्थिती' असे वर्णन केले आहे.
वकिलाला व्हावं लागले अपमानित
अॅड. लोडुका नावाच्या वकिलाला या केस संबंधित सर्व माहिती त्यांची सहकारी श्वार्ट्ज यांनी गोळा करून दिली होती. अॅड. श्वार्ट्ज गेल्या 30 वर्षापासून वकिली करत आहेत. त्यांनी या केसशी संबंधित जुन्या केसचा शोध घेण्यासाठी ChatGPT चा वापर केला होता. जेव्हा त्यांना याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला, तेव्हा अॅड. श्वार्ट्ज यांनी AI टूलने त्यांना चुकीची माहिती दिल्याचे सांगितले आहे आणि त्यांना हे माहितीच नव्हते की AI टूल चुकीची माहिती देऊ शकते. याशिवाय त्यांनी एका लेखी निवेदनात स्पष्ट करताना सांगितले की, लोडुका यांना या गोष्टींची कोणतीही कल्पना नव्हती की केसची माहिती कशी गोळा केली आहे. त्यामुळे त्यांचा या घटनेशी कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता.
AI टूलचा वापर करताना राहा सावध
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, बऱ्याच वेळा चॅटबॉटकडून भ्रमित करणारी माहिती दिली जाऊ शकते. या टूलकडून तुम्हाला चुकीची माहिती दिली जाऊ शकते. AI टूलवर विश्वास ठेवून अनेक युजर्स चुकीच्या गोष्टींनाही सत्य समजू लागले आहेत. त्यामुळे आपण स्वत:हून फॅक्ट चेक करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे कळत न कळतपणे ChatGPT चा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
इतर बातम्या वाचा :