आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
Shambhuraj Desai: आम्ही सत्तेमध्ये होतो पण आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. पुढे काय होणार आहे, बहुमत होणार आहे की नाही, युती टिकणार आहे की नाही याचा आम्ही विचार केला नाही, असे ते म्हणाले.

Shambhuraj Desai: 2022 मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी किती टिकवण्यासाठी उठावाची भूमिका घेतली त्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला त्यामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली आणि पर्यायाने भाजप ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठाव कारणीभूत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. आम्ही सत्तेमध्ये होतो पण आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. पुढे काय होणार आहे, बहुमत होणार आहे की नाही, युती टिकणार आहे की नाही याचा आम्ही विचार केला नाही. त्यामुळे या गोष्टीचा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा, असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. मंगलप्रभात लोढा यांनी काल 2014 पर्यंत भाजप राज्यात तेवढी ताकदवान नव्हती असं वक्तव्य केलं होते, या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सुनावले.
मंगलप्रभात लोढांना शंभूराज देसाईंना खोचक टोला
शंभूराज देसाई म्हणाले की, 2014 पर्यंत इतकी ताकदवान भाजप महाराष्ट्रामध्ये नव्हती म्हणजे हे त्यांनी स्वीकारलं. आता भाजप ताकदवान आहे किंवा भाजपचे लोक विधानसभेला आमदार जास्त निवडून आले ही वस्तुस्थिती आहे. नंतरच्या काळात जेव्हा एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घेतली. आम्ही 50 आमदारांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थाने स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे ही पुन्हा सत्तेमध्ये आली. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती शिंदे साहेबांनी परत भक्कम केली.
महायुती भक्कम करायचं काम शिंदे साहेबांनी केलं
त्यांनी सांगितले की, कोणताही निर्णय शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी विचारविनिमय करूनच निर्णय घेत होते. महायुती भक्कम करायचं काम शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळे मला मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक सांगायचे की तुम्ही म्हणत आहात ती वस्तुस्थिती आहे. 2014 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती पण 2022 ला शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला.
ही श्रेयवादाची लढाई नाही
दुसरीकडे, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र होते म्हणून महायुती होती आणि म्हणून आपण सत्तेत आहोत याचे भान असायला प्रत्येकाला असायला पाहिजे, असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिन्ही नेते समन्वयाने काम करत आहेत. कोण कोणामुळे सत्तेत आहे ही श्रेयवादाची लढाई नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भल्यासाठी आपण एकत्र आहोत याचाच विचार महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करावा. तसं केलं तर वाद होणार नाही, समन्वय राहणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री समन्वयाने काम करतात. यंदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी महायुती नाही झाली म्हणून मतभेद असले तरी मनभेद नक्कीच नाही हे निश्चित.
इतर महत्वाच्या बातम्या





















