विराट कोहली सचिनचा 'हा' विक्रम मोडण्याच्या तयारीत
सचिनच्या नावावर असलेल्या विक्रम मोडण्यासाठी विराट केवळ 6 धावा दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी मालिकेत विराट सचिनचा हा विक्रम मोडेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे एक नवं समीकरण क्रिकेटमध्ये बनलं आहे. विराटने क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. विराटच्या या विक्रमाच्या यादीत आणखी एका विक्रमाची भर लवकरत पडणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडण्याच्या जवळ विराट पोहोचला आहे.
सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 120 डावांत 6 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराट याबाबत सचिनच्या एक पाऊल पुढे आहे. विराटने आतापर्यंतच्या 118 डावांत 5994 धावा ठोकल्या आहेत. सचिनच्या या विक्रमापासून विराट केवळ सहा धावा दूर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी मालिकेत विराट सचिनचा हा विक्रम मोडेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. याशिवाय भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही विराट सचिनचा रेकॉर्ड मोडले, असं म्हटलं आहे. सेहवागने म्हटलं की, "मला पूर्ण विश्वास आहे की चौथ्या कसोटीत विराट हा विक्रम आपल्या नावे करेल."
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यात 440 धावा ठोकल्या आहेत. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.