एक्स्प्लोर
Under 19 Asia Cup | भारताला सातव्यांदा अंडर-19 आशिया चषकाचा मान
अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 107 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण डावखुऱ्या अथर्व अंकोलेकरच्या फिरकीसमोर भारतानं बांगलादेशचा डाव 101 धावांत गुंडाळला. अथर्वनं 28 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर आकाश सिंगनं तीन विकेट्स घेतल्या.

मुंबई : भारतीय अंडर नाईन्टिन संघानं बांगलादेशवर निसटती मात करुन सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या या युवा संघानं अंतिम सामन्यात बांगलादेशवर अवघ्या पाच धावांनी विजय साजरा केला.
कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईचा अथर्व अंकोलेकर हा भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 107 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण डावखुऱ्या अथर्व अंकोलेकरच्या फिरकीसमोर भारतानं बांगलादेशचा डाव 101 धावांत गुंडाळला. अथर्वनं 28 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर आकाश सिंगनं तीन विकेट्स घेतल्या.
त्याआधी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार ध्रुव जोरेल, करण लाल आणि शाश्वत रावत या तिंघांव्यतिरुक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे भारताचा डाव 32.6 षटकांत 106 धावांत गडगडला.
107 धावांचं आव्हान बांगलादेश सहज पार करेल असं वाटत असतानाच अथर्व अंकोलेकरच्या फिरकीनं कमाल केली. त्यानं आठ षटकांत अवघ्या 28 धावा देत बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्यामुळे बांगलादेशचा डाव 33 षटकांत 101 धावांत संपुष्टात आला. अथर्व अंकोलेकरलाच सामनावीराचा बहुमान देण्यात आला. तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्याच अर्जुन आझादला स्पर्धावीराचा बहुमान मिळाला.
अथर्व अंकोलेकरनं याआधी मुंबईच्या अंडर 14, अंडर 16 आणि अंडर 19 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अथर्वसह या संघात मुंबईच्याच सुवेद पारकर आणि वरुण लवंडेचा समावेश होता.
भारताची अंडर-19 आशिया चषकातली कामगिरी
1989 - विजेतेपद (अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 40 धावांनी मात)
2003 - विजेतेपद (अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 8 विकेट्सनी धुव्वा)
2012 - संयुक्त विजेतेपद (अंतिम सामना टाय, दोन्ही संघांना विजेतेपदाचा मान)
2013/14 - विजेतेपद (अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 40 धावांनी विजय)
2016 - विजेतेपद (अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 34 धावांनी मात)
2017 - साखळी फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात
2018 - विजेतेपद (अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 144 धावांनी विजय)
2019 - विजेतेपद (अंतिम सामन्यात बांगलादेशवर 5 धावांनी निसटती मात)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
