India Wins Gold: शूटिंगमध्ये मनीष नरवालनं जिंकलं सुवर्णपदक तर सिंहराजला रौप्यपदक, भारताची पदकसंख्या 15 वर
Tokyo Paralympic 2020 : भारताच्या मनीष नरवालनं (Manish Narwal) 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे तर सिंहराजनं (Singhraj)याच प्रकारात रौप्यपदक मिळवून दिलं आहे.
Tokyo Paralympic 2020 : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आजच्या दिवसाची सुरुवात सोनेरी झाली आहे. 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळालं आहे. भारताच्या मनीष नरवालनं 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे तर सिंहराजनं याच प्रकारात रौप्यपदक मिळवून दिलं आहे. सिंहराज अधानानं याआधी कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं होतं. आता त्यानं रौप्यपदक जिंकून आपलं दुसरं पदक निश्चित केलं आहे.
#TokyoParalympics, Shooting P4 Mixed 50m Pistol SH1: Manish Narwal wins gold, Singhraj bags silver. pic.twitter.com/nUTf8cpRUR
— ANI (@ANI) September 4, 2021
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी दोन पदकाची भर पडली आहे. भारताच्या खात्यात आता एकूण 15 पदकं झाली आहेत. मनीष नरवालनं भारताला या स्पर्धेतलं तिसरं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. हरियाणाच्या कथुरा गावातल्या या 19 वर्षीय युवा खेळाडूनं इतिहास रचला आहे. मनीषनं पहिल्या दोन शॉटमध्ये 17.8 स्कोर केला होता. मात्र त्यानंतर त्यानं शानदार वापसी केली. पाच शॉट नंतर मनीष नरवाल टॉप थ्रीमध्ये आला. पाच शॉटनंतर त्याचा स्कोर 45.4 होता तर 12 शॉट नंतर मनीषचा स्कोर 104.3 होता.
याआधी भारताला अवनी लेखरानं 10 मीटर शूटिंगमध्ये तर सुमित अंतिलनं भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. काल भारताच्या हरविंदर सिंहने इतिहास रचला. हरविंदर सिंहने टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करत पुरुष एकल Recurve Open मध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे.
भारतानं आतापर्यंत जिंकलेली पदकं
सुवर्णपदक - 03
रौप्यपदक- 07
कांस्यपदक - 05
एकूण - 15
अवनी लेखराची दोन पदकं
भारताची पॅराशूटर अवनी लेखरानं या स्पर्धेत भारताला दोन पदकं जिंकून दिली आहेत. अवनीनं 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. आधी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली. अवनी या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सातव्या स्थानी होती. अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं.