एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत देणाऱ्या श्रीशांतला BCCIचं उत्तर
बीसीसीआयने घातलेली आजन्म बंदी केरळ उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
दुबई : पुन्हा आजन्म बंदी घातल्यानंतर क्रिकेटर एस.श्रीशांतने दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत दिले आहेत. दुबईमधील एका कार्यक्रमात बोलताना श्रीशांत म्हणाला की, "मी दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळूच शकतो. माझं वय 34 वर्ष आहे आणि आणखी 6 वर्ष तरी क्रिकेट खेळू शकतो."
बीसीसीआयने घातलेली आजन्म बंदी केरळ उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. "आयसीसीचे नियम स्पष्ट आहेत आणि श्रीशांत दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकत नाही," अशी प्रतिक्रिया बीसीसीआयने त्याच्या विधानावर दिली.
बीसीसीआयने बंदी घातलीय, आयसीसीने नाही : श्रीशांत
"बीसीसीआयने माझ्यावर बंदी घातलीय, आयसीसीने नाही. भारतासाठी नाही तर मी दुसऱ्या कोणत्याही देशासाठी नक्कीच खेळू शकतो. माझं वय 34 वर्ष आहे. मी आणखी 6 वर्ष तरी क्रिकेट खेळू शकतो. क्रिकेटवर प्रेम करणारा खेळाडू म्हणून मला खेळायचं आहे. बीसीसीआय एक खासगी संस्था आहे, जी आपल्याला सांगते की हा भारतीय संघ आहे. पण तुम्हाला माहितच आहे, शेवटी बीसीसीआय एक खासगी संस्थाच आहे," असं श्रीशांत म्हणाला.
सीएसके, राजस्थानला एक न्याय, मला वेगळा का? : श्रीसंत
श्रीशांत कोणत्याही देशाकडून खेळू शकत नाही : बीसीसीआय
श्रीशांतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी म्हणाले की, "आयसीसीचा सदस्य असलेल्या देशाने एखाद्या खेळाडूवर बंदी घातली तर तो दुसऱ्या सदस्य देशाकडून किंवा संस्थेकडून खेळू शकत नाही. त्याच्या विधानाला अर्थ नाही, आम्हाला कायदेशीर बाबी माहित आहेत."
खंडपीठाचा निकाल काय?
न्यायमूर्ती मोहम्मद मुश्ताक यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने 7 ऑगस्ट 2017 च्या निर्णयात, बीसीसीआयने घातलेली बंदी उठवली होती. याशिवाय श्रीशांतविरोधात बोर्डाने केलेली कारवाईही रद्द केली होती. खंडपीठाने आजन्म बंदीविरोधात श्रीशांतच्या याचिकेवर बोर्डाकडून उत्तर मागितलं होतं.
श्रीसंत पुन्हा कधीही क्रिकेट खेळू शकणार नाही!
बीसीसीआयने कोणत्या आधारवर बंदी घातली?
पुराव्यांच्या आधारावर श्रीशांतवर आजन्म बंदी घातली होती, असं उत्तर बीसीसीआयने दिलं होतं.
बोर्डाच्या निकालाला श्रीशांतचं आव्हान
2013 मधील आयपीएलच्या सहाव्या मोसमात बीसीसीआयने श्रीशांतला स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरवून त्याच्यावर आजन्म बंदी घातली होती. श्रीशांतने आजन्म बंदीला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. आरोपातून मुक्तता झाल्याचा दावा, श्रीशांतने याचिकेत केला होता.
बीसीसीआयचा कोर्टात दावा
बीसीसीआयने कोर्टात सांगितलं की, "सत्र न्यायालयाने श्रीशांतला गुन्हेगारी आरोपातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या निकालाचा परिणाम बोर्डाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर घातलेल्या बंदीवर होणार नाही. श्रीशांत बोर्ड किंवा त्याच्याशी संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत नाही."
श्रीशांतला कोर्टाकडून कधी दिलासा मिळाला?
स्पॉट फिक्सिंगप्रकरणात श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला सांच्यासह सर्व 36 आरोपींची जुलै 2015 मध्ये पटियाला हाऊस कोर्टाने सुटका केली होती. परंतु यानंतरही बीसीसीआयने या खेळाडूंवरील आजन्म बंदीचा निर्णय बदलण्यास नकार दिला होता.
एस श्रीशांतचं करिअर?
श्रीशांतने 2005 मध्ये श्रीलंकेविरोधात वन डेमध्ये तर 2006 मध्ये इंग्लंडविरोधात कसोटीत पदार्पण केलं होतं. 27 कसोटी सामन्यांमध्ये श्रीशांतने 87 विकेट्स घेतल्या. 99 धावांमध्ये 8 विकेट्स हा त्याचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता. 53 वन डे सामन्यात श्रीशांतने 75 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याचा बेस्ट परफॉर्मन्स 55 धावांमध्ये 6 विकेट्स असा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement