एक्स्प्लोर
Advertisement
...म्हणून वडिलांनी मिताली राजच्या हाती बॅट सोपावली!
1999 साली आयर्लंडविरुद्ध सामन्यातून मिताली राजनं आपल्या करिअरला सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात 114 धावांची शानदार खेळी करणाऱ्या या 17 वर्षीय मुलीनं भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप पाडली.
मुंबई: कर्णधार मिताली राजच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडचा 186 धावांनी पराभव करत महिला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. महिला क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करणारी मिताली ही पहिली महिला फलंदाज आहे. पण तिचा आजवरचा हा प्रवासही काही सोपा नव्हता.
काही मीडिया रिपोर्टनुसार, मितालीची वार्षिक कमाई जवळजवळ 5.5 कोटी आहे. तरीही तिचं राहणीमान फारच साधं आहे. आजही ती आपल्या जुन्या घरातच राहते.
भारतीय क्रिकेट महिला संघाच्या या कर्णधाराचा जन्म 1982 साली जोधपूरमध्ये झाला होता. मितालीचे वडील दुराई राज हे वायू सेनेत अधिकारी होते. तर आई लीला राज या देखील क्रिकेट खेळत होत्या. त्यामुळे कुटुंबातूनच मितालीला क्रिकेटचे धडे मिळू लागले होते. सुरुवातीच्या काळात मिताली शास्त्रीय नृत्य शिकत होती. मितालीच्या कुटुंबाचा नृत्याकडेही ओढा होता.
पण शिस्तीच्या बाबतीत आपल्या मुलांकडे काटेकोरपणे लक्ष ठेवणाऱ्या दुराई राज यांना मितालीचा आळशीपणा आवडायचा नाही. त्यामुळेच त्यांनी मितालीच्या हाती बॅट सोपावली. तेव्हा मितालीचं वय होतं फक्त 10 वर्ष. त्यानंतर मितालीला देखील या खेळामध्ये आवड निर्माण झाली. हळूहळू यामध्येच करिअर करण्याचा तिचा निर्णय पक्का झाला.
शालेयवयात मिताली बऱ्याचदा मुलांसोबत क्रिकेट खेळायची. ज्यामुळे तिचा खेळ आणखी सुधारला आणि याचं फळ तिला वयाच्या 17व्या वर्षीच मिळालं. कारण की, तिची निवड थेट भारतीय संघात करण्यात आली.
1999 साली आयर्लंडविरुद्ध सामन्यातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात 114 धावांची शानदार खेळी करणाऱ्या 17 वर्षीय मुलीनं भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप पाडली.
भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर मितालीनं पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. वनडेत शानदार कामगिरी करणाऱ्या मितालीला 2002 साली कसोटी संघातही स्थान मिळालं. इंग्लंडविरुद्ध लखनौमध्ये तिनं पदार्पण केलं. त्याच वर्षी मितालीनं इंग्लंडविरुद्ध आपलं पहिलं दुहेरी शतक ठोकलं होतं.
2004 साली मितालीला भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं. पण मधल्या काही काळात झुलन गोस्वामीला कर्णधारपद देण्यात आलं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा मितालीकडेच कर्णधारपद सोपावण्यात आलं.
मितालीच्या नेतृत्वाखाली 2005 साली भारतीय संघानं फायनलपर्यंत धडक मारली होती. पण फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
क्रिकेटमधील दिलेल्या योगदानासाठी मितालीला 2003 साली अर्जुन पुरस्कार तर 2015 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
मितालीनं भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 8000 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 7 शतकं आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement