खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Mumbai Jogeshwari News : विकासकाकडून भाडे रखडल्यामुळे झोपडी धारकांने विकासकाच्या कार्यालयासमोरच विष पिऊन आत्महत्या केली. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी पोलीस स्टेशनचा हद्दीत ही घटना घडली आहे.
मुंबई : जोगेश्वरी पूर्वेला एका खासगी प्रकल्पातील झोपडीधारकाने भाड न मिळाल्यामुळे विष पिऊन विकासकाच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत झोपडीधारकाचा जोगेश्वरीतील महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात गुरुवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या झोपडीधारकाचे नाव अहमद हुसेन शेख असून त्याचे वय 46 वर्षे होते.
अहमद यांची झोपडी ओमकार डेव्हलपर यांनी प्रकल्पासाठी निष्कासित केली होती. या झोपडीधारकाचे मागील चार वर्षापासून विकासकाकडे भाडे थकले असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केली आहे. मागील काही महिन्यापासून विकासकाच्या जोगेश्वरी पूर्व जनता मार्केट समोर असलेल्या कार्यालयात अहमद भाडे मिळण्यासाठी फेऱ्या मारत असल्याची माहिती समोर येत आहे. अखेर अहमद यांनी बुधवारी सायंकाळी कार्यालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
विष प्यायल्यानंतर अहमद यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी अहमद यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मृत अहमद यांचे चार भाऊ आहेत. प्रकल्पातील रूम ही त्यांच्या आईच्या नावावर असून तिचे निधन झाले आहे. त्यामुळे चारही भावंडांनी भाडं मिळण्यासाठी विकासकाकडे दावा केला. यामुळे विकासकांनी भाडे कोणाला द्यायचे, या संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झालं, अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे.
ही बातमी वाचा: