सायना नेहवालची डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत धडक
सायनानं उपांत्य फेरीत 19व्या स्थानावरच्या ग्रेगरिया मरिस्का टुनजुन्गचा 21-11, 21-12 असा धुव्वा उडवला. डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ही सायनाची दुसरी वेळ आहे.
डेन्मार्क : भारताची फुलराणी सायना नेहवालनं डेन्मार्क ओपन बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत धडक मारली. सायना बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सध्या दहाव्या स्थानावर आहे. तिनं उपांत्य फेरीत 19व्या स्थानावरच्या ग्रेगरिया मरिस्का टुनजुन्गचा 21-11, 21-12 असा धुव्वा उडवला.
भारताच्या ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूचं या स्पर्धेतलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. पण सायना यंदा जबरदस्त फॉर्मात आहे. तिनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचं कडवं आव्हान संपुष्टात आणलं होतं. त्यापाठोपाठ सायनानं जपानच्या नोझोमी ओकुहारालाही डेन्मार्क ओपनमधून गाशा गुंडाळायला लावला.
डेन्मार्क ओपनच्या अंतिम सामन्यात सायनाचा सामना वर्ल्ड नंबर वन चीनच्या ताई जु यिंगविरोधात होणार आहे. ताई त्झू यिंगने उपांत्य फेरीत चीनच्याच बिंगजियाओला अवघ्या 30 मिनिटात 21-14, 21-12नं पराभूत केलं होतं. यिंगविरोधात सायनाचं रेकॉर्ड तिकका चांगला नाही. दोघींमध्ये झालेल्या 17 सामन्यात सायनाला 12 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ही सायनाची दुसरी वेळ आहे. 2012 साली तिने डेन्मार्क ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं होतं.