एक्स्प्लोर
कसोटी मालिकेसाठी संघ निवडीत राहुल द्रविडचीही मोलाची भूमिका
एकीकडे भारतीय अ संघ इंग्लंड लॉयन्सच्या विरोधात चार दिवसीय सामना खेळत असेल, तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वन डे मालिका जिंकण्यासाठी रणनीती आखत असेल अशा परिस्थितीत संघाची निवड होणार आहे.

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे भारतीय अ संघ इंग्लंड लॉयन्सच्या विरोधात चार दिवसीय सामना खेळत असेल, तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वन डे मालिका जिंकण्यासाठी रणनीती आखत असेल अशा परिस्थितीत संघाची निवड होणार आहे. निवडकर्त्यांनी सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांना अगोदरच इंग्लंडला पाठवलं आहे. दोघांचीही कसोटी संघातील जागा पक्की आहे. मात्र त्यापूर्वी दोघांना सराव सामन्याची गरज आहे. मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे वोरसेस्टरच्या काऊंटी ग्राऊंडमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळतील. मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अखेरचा कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने शानदार विजय मिळवला. निवडकर्त्यांनी संघ व्यवस्थापन आणि भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी सल्लामसलत करण्याची योजना आखली आहे. कसोटी संघात जागा मिळवण्याच्या शर्यतीत असलेले जास्तीत जास्त खेळाडू सध्या इंग्लंडमध्येच आहेत. भारताचे आणखी दोन कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. तर इतर खेळाडू सध्या चालू असलेल्या वन डे मालिकेत व्यस्त आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मागच्या म्हणजे 2014 च्या दौऱ्यात मुरली विजयने नॉटिंगहॅममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत, तर रहाणेने लॉर्ड्स कसोटीत शतक ठोकलं होतं. ऋषभ पंतला संधी मिळणार? निवडकर्त्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न यष्टिरक्षक निवडीचा असेल. भारतीय कसोटी संघाचा नियमित यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला आयपीएलदरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती, ज्यातून तो अजून सावरलेला नाही. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या दुखापतीबद्दलही ताज्या माहितीची सर्वांना प्रतीक्षा आहे. साहाच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिक यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असेल, तर बॅकअप खेळाडू म्हणून पहिली पसंत ऋषभ पंत असेल. ऋषभ पंत सध्या इंग्लंडमध्येच भारतीय अ संघाकडून यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत खेळत आहे. वन डे तिरंगी मालिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यातील विजयात पंतची मोलाची भूमिका आहे. त्याने या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. दुसरीकडे मोहम्मद शमीने यो यो टेस्ट पास केली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक समस्यांमुळे अडचणीत असलेला शमी मानसिकदृष्ट्या फिट आहे का, याचीही चाचपणी व्यवस्थापनाकडून केली जाऊ शकते. 'वाह क्रिकेट'चा संभावित भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी कसोटी मालिकेचं वेळापत्रक पहिली कसोटी - 1 ऑगस्ट, बर्मिंगहॅम दुसरी कसोटी - 9 ऑगस्ट- लॉर्ड्स, लंडन तिसरी कसोटी- 18 ऑगस्ट- ट्रेन्ट ब्रिज चौथी कसोटी- 30 ऑगस्ट- द रोज बोऊल, साऊथेम्पटन पाचवी कसोटी- 7 सप्टेंबर- केनिंग्टन ओवल (द ओवल), लंडन
आणखी वाचा























