फ्रान्सने फायनलमध्ये धडक मारताच पॅरिसमध्ये मोठा जल्लोष
फ्रेन्चचं राष्ट्रगीत ‘ला मार्सेली’चे सूर टिपेला पोहोचले होते. राष्ट्रगीताची सांगता होताच, ‘वुई आर इन दी फायनल्स’ अशा घोषणा देण्यात आल्या.
मॉस्को: रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात फ्रान्सने बेल्जियमला नमवून फायनलमध्ये धडक मारली आहे. फ्रान्सच्या विजयानंतर पॅरिसमधील ऐतिहासिक हॉटेल डी विलेमध्ये सेलिब्रेशनला उधाण आलं आहे.
फ्रेन्चचं राष्ट्रगीत ‘ला मार्सेली’चे सूर टिपेला पोहोचले होते. राष्ट्रगीताची सांगता होताच, ‘वुई आर इन दी फायनल्स’ अशा घोषणा देण्यात आल्या. पॅरिसच्या शॉज एलिजे या भव्य मार्गावरही सेलिब्रेशनचंच चित्र पहायला मिळालं.
फ्रान्सचा संघ फायनलमध्ये गेल्यानंतर पॅरिसचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बहुतेक नागरिकांच्या हातात फ्रान्सचा तिरंगा होता. त्यांनी आपल्या टीमची जर्सी परिधान केली होती. कारचालकांनी हॉर्न वाजवून, तर इतर नागरिकांनी आकर्षक फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.
दरम्यान, बाद फेरीतील पहिल्या सेमीफायनलमध्ये फ्रान्सने विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारल्यानंतर आज इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात दुसरी सेमीफायनल होत आहे. या दुसऱ्या सेमीफायनलमधील विजयी संघाची फायनलमध्ये 15 जुलैला फ्रान्सबरोबर टक्कर होईल.