एक्स्प्लोर
षटकार ठोकून राहुलने इतिहास रचला!
जमैका : रोस्टन चेसच्या चेंडूवर षटकार ठोकून लोकेश राहुलने इतिहास रचला. कॅरेबियन मैदानावरील पहिल्यात कसोटीत दमदार शतक ठोकणारा लोकेश राहुल भारताचा पहिला फलंदाज बनला आहे. याआधी 1996-97 च्या दौऱ्यात पाच सामन्यांच्या मालिकेत, अजय जाडेजाने चौथ्या सामन्यात 96 धावांची खेळी रचली होती.
लोकेश राहुलच्या याच शतकी खेळीनं जमैका कसोटीवर भारतानं आपली पकड आणखी मजबूत बनवली. मुरली विजयला दुखापत झाल्यानं लोकेश राहुलला जमैका कसोटीत खेळण्याची संधी मिळाली, आणि त्यानं त्या संधीचं सोनंही केलं.
लोकेश राहुलने 303 चेंडूंत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 158 धावांची खेळी उभारली. कसोटी क्रिकेटमध्ये राहुलचं हे तिसरं शतक ठरलंय. केवळ सहा सामन्यांतच राहुलच्या नावावर तीन शतकं जमा झाली आहेत. तीही तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये. राहुलने गेल्या वर्षी सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावांची खेळी केली होती. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत त्यानं 108 धावा केल्या होत्या. आता विंडीजमध्येही राहुलनं शतक ठोकलं आहे.
एकाच डावात राहुलने अनेक माईलस्टोन गाठले
जमैका कसोटीत शतक झळकावून लोकेश राहुलने अनेक माईलस्टोन्स गाठले. विंडीजमध्ये पहिल्याच कसोटी डावात शतक ठोकणारा लोकेश राहुल हा भारताचा आजवरचा पहिलाच सलामीवीर ठरला. तसेच सलामीवीर या नात्याने विंडीजमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पॉली उम्रीगर यांचा गेल्या 63 वर्षांचा विक्रमही लोकेश राहुलने मोडून काढला. पॉली उम्रीगर यांनी 1953 सालच्या विंडीज दौऱ्यात 130 धावांची खेळी केली होती. कसोटी कारकीर्दीतल्या पहिल्या तीन अर्धशतकांचं शतकात रुपांतर करणारा लोकेश राहुल हा मोहम्मद अझरुद्दीननंतरचा पहिलाच खेळाडू ठरला.
संधीचं सोनं करण्यात राहुल यशस्वी
लोकेश राहुलने त्याच्या कसोटी कारकीर्दीत तीन शतकं ठोकली आहेत. पण ही तिन्ही शतकं त्याच्यासाठी खास ठरली आहेत. जमैका कसोटीत दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी राहुलला संधी देण्यात आली आणि त्याने त्याचा फायदा उचलून शतक ठोकलं. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत चेतेश्वर पुजाराऐवजी राहुलचा संघात समावेश करण्यात आला होता. तर कोलंबो कसोटीत दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी राहुलला संधी देण्यात आली होती. या सर्व सामन्यांत लोकेश राहुलने शतकी खेळी केली.
वन डे आणि आयपीएलमध्येही आश्वासक कामगिरी
कसोटीशिवाय वन डेतही राहुलच्या नावावर शतक जमा आहे. राहुलनं गेल्या महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावरील पहिल्याच वन डेत नाबाद शतक झळकावलं होतं. त्याआधी आयपीएलमध्येही राहुलने आश्वासक फलंदाजी केली होती.
आयपीएलमध्ये राहुलने 14 सामन्यांत 44.11च्या सरासरीने 397 धावा केल्या होत्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला फायनलचं तिकीट मिळवून देण्यातही महत्त्वाचं योगदान दिलं होतं.
कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी या तिन्ही फॉरमॅटमध्ये लोकेश राहुलने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. आता येणाऱ्या काळातही त्याच्याकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement