IPL 2023 : धोनीची जडेजाला 'जादू की झप्पी', जडेजाची शेवटच्या षटकात दमदार खेळी; चेन्नई पाचव्यांदा विजेता
CSK Won IPL 2023 : चेन्नईनं पाचव्यांचा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यासोबतच चेन्नई (CSK) पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा संघ बनला आहे.
IPL 2023 Final, CSK vs GT : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात जायंट्सचा पाच गडी राखून पराभव केला. चेन्नईनं पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यासोबतच चेन्नई (CSK) पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा संघ बनला आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात संघाने 214 धावा ठोकल्या होत्या. मात्र पावसामुळे चेन्नईला विजयासाठी 15 षटकांत 171 धावांचं लक्ष्य मिळालं. चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला.
चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा आयपीएल विजेता
अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत अतिशय रोमांचक ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचा थरार पाहायला मिळाला. जडेजाने शेवटच्या षटकात जबाबदारी घेत संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल 2023 साठीचा विनिंग शॉट रविंद्र जडेजानं ठोकला. जडेजाने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर गुजरातचा पराभव केल्यावर कर्णधार धोनीनं रविंद्र जडेजाला 'जादूची झप्पी' दिली.
अंतिम सामन्यात चेन्नईची गुजरातवर मात
चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 214 धावा केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावून हा सामनामधे स्थगित केला. सुमारे अडीच तास खेळ स्थगित झाल्यानंतर 12.10 वाजता पुन्हा सामना सुरु करण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचं लक्ष्य मिळालं.
Spirits UPL7️⃣FT8️⃣D 🙌🫂pic.twitter.com/dMyYzxcx6H
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 29, 2023
जडेजा ठरला चेन्नईच्या विजयाचा 'हिरो'
सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 13 धावांची गरज होती. गुजरातकडून मोहित शर्मा गोलंदाजीसाठी उतरला. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिवम दुबे स्ट्राइकवर आणि रवींद्र जडेजा नॉन स्ट्रायकिंग एंडवर होता. या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहित शर्मानं रूटमध्ये यॉर्कर टाकला. या चेंडूवर शिवम दुबेला एकही धाव काढता आली नाही. मोहितने दुसरा चेंडूही याचप्रमाणे टाकला पण, यावेळी शिवमने एक धाव काढली टाकला. पुढच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजा स्ट्राइकवर आला आणि त्यानेही एकच धाव घेतली. आता चेन्नईला शेवटच्या तीन चेंडूत 11 धावांची गरज होती. त्यानंतर चौथ्या चेंडूवर शिवमने एक धाव घेतली आणि जडेजा स्ट्राईकवर आला. दोन चेंडूत दहा धावांची गरज असताना जडेजाने पाचव्या चेंडूंवर षटकार ठोकला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत जडेजानं चेन्नईला विजय मिळवून दिला.