IPL 2023 : गुजरातचा पराभव करत चेन्नईनं पटकावलं विजेतेपद; जडेजाचा 'विनिंग' चौकार, कसा होता अखेरच्या षटकाचा थरार? जाणून घ्या
CSK vs GT, IPL 2023 Final : गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा चॅम्पियन ठरला आहे. जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करत संघात विजय मिळवून दिला.
IPL 2023 Final, GT vs CSK : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव केला आहे. रोमांचक सामन्यात चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर गुजरातवर विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नई संघाला 171 धावांचं आव्हान होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना अतिशय रोमांचक ठरला. जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करत संघात विजय मिळवून दिला.
जडेजाचा 'विनिंग' चौकार, कसा होता शेवटच्या षटकाचा थरार?
शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूत तीन धावा झाल्या. यानंतर चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. रवींद्र जडेजा स्ट्राइकवर होता. जडेजाने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर चेन्नईला विजयासाठी एका चेंडून चार धावांची गरज होती. यावेळी जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. या विजयासह चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
𝙄𝘾𝙊𝙉𝙄𝘾!
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
A round of applause for the victorious MS Dhoni-led Chennai Super Kings 👏🏻👏🏻#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/kzi9cGDIcW
चेन्नई सुपर किंग्सचा पाचव्यांदा चॅम्पियन
चेन्नई सुपर किंग्सचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 214 धावा केल्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने अडीच तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 12.10 वाजता पुन्हा सामना सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचं लक्ष्य मिळालं.
This moment is ♾️🫶💛#IPL2023Final #CSKvGT #WhistlePodu #Yellove 🦁💛pic.twitter.com/6BCgehszxy
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 29, 2023
पावसामुळे अंतिम सामन्यात व्यत्यय
आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी होणार होता. पण, 28 मे रोजी अहमदाबादेत पावसाने हजेरी लावली, त्यामुळे हा सामना सोमवारी खेळवण्यात आला. सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. यानंतर चेन्नईच्या फलंदाजी वेळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे सामना मधेच थांबवण्यात आला. त्यानंतर पाऊस थांबल्यावर डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या चेंडूवर चेन्नईनं आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं.