IPL 2023, DC vs MI: बेहरेनडॉर्फ-चावलाची भेदक गोलंदाजी, दिल्लीचा डाव 172 धावांवर संपला
IPL 2023, DC vs MI : मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा डाव 172 धावांवर संपुष्टात आला.
IPL 2023, DC vs MI : मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा डाव 172 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीला 20 षटके फलंदाजीही करता आली नाही. पीयुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ या दोघांनी दिल्लीच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले. तर रिले मेरेडिथ याने दोन विकेट घेतल्या. मुंबईला विजयासाठी 173 धावांची गरज आहे.
अक्षर पटेलची झंझावाती फलंदाजी -
दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले होते. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत जात होते. त्यावेळी अक्षर पटेल यांनी चित्र बदलले. अक्षर पटेल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. अक्षर पटेल याला बेहरनडॉर्फ याने बाद केला. अक्षर पटेल याने 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीत अक्षर पटेल याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. अक्षर पटेल याने डेविड वॉर्नर याच्यासोबत 35 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. यामध्ये अक्षर पटेल याचे योगदान 54 धावांचे होते.
डेविड वॉर्नरचा संयम -
एका बाजूला विकेट पडत असताना डेविड वॉर्नर याने संयमी फलंदाजी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. डेविड वॉर्नर याने 47 चेंडूत संयमी 51 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नर याने सहा चौकार लगावले. वॉर्नर याने संथ फलंदाजी केली. त्याच्या बॅटवर चेंडू येत नव्हता.. त्यात दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. पण डेविड वॉर्नर याने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केलेय. डेविड वॉर्नर याने सलामीला पृथ्वी शॉ याच्यासोबत 33 धावांची भागिदारी केली. त्यानंतर मनिष पांडे याच्यासोबत 43 धावा जोडल्या. तर अक्षर पटेल याच्यासोबत 67 धावांची भागिदारी केली.
दिल्लीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो -
मुंबईच्या गोलंदाजांसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पथ्वी शॉ 15 धावा काढून बाद झाला. मनिष पांडे चांगल्या सुरुवातीनंतर 26 धावांवर बाद झाला. यश धुल दोन धावांवर तंबूत परतला. रोवमन पॉवेल चार धावा काढून बाद झाला. तर ललीत यादव दोन धावांवर बाद झाला.
पीयुष चावलाचा भेदक मारा -
अनुभवी फिरकीपटू पीयुष चावला याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. चावलाने दिल्लीच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. पीयुष चावला याच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीचे फलंदाजांनी गुडघे टेकले. चावलाने चार षटकात अवघ्या 22 धावा खर्च करत तीन गड्यांना तंबूत पाठवले. पीयुष चावलाने मनिष पांडे, रोममन पॉवेल आणि ललीत यादव यांना तंबूत पाठवले.
मुंबईने सात गोलंदाजांचा केला वापर -
रोहित शर्माने दिल्लीविरोधात सात गोलंदाजांचा वापर केला. सूर्यकुमार यादव, इशान किशन, रोहित शर्मा आणि नेहाल वढेरा वगळता सर्व खेळाडूंचा गोलंदाजीसाठी वापर केला. पीयुष चावला याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. एच. शौकिन याने एक विकेट घेतली. कॅमरुन ग्रीन, अरशद खान, तिलक वर्मा यांना विकेट घेण्यात अपयश आले. रिले मेरेडिथ याने दोन विकेट घेतल्या. जेसन बेहरेनडॉर्फ याने तीन फलंदाजांना तंबूत पाठवले.