IPL 2024 Auction Updates : आयपीएल लिलावात या 5 युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर सर्वच संघांचे लक्ष
IPL 2024 Auction Updates : लिलावात अनुभवी खेळाडूंसह अनेक युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी मालकांची नजर असेल. PL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे.
IPL 2024 Auction Updates : IPL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. या लिलावात अनुभवी खेळाडूंसह अनेक युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी मालकांची नजर असेल. या आयपीएल लिलावात अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे आश्चर्यचकित करू शकतात.
अर्शीन कुलकर्णी (Arshin Kulkarni)
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील असलेला अर्शीन उत्तुंग षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. याशिवाय तो एक उपयुक्त वेगवान गोलंदाजही आहे. तो सध्या भारतीय अंडर-19 संघाचा भाग आहे, जो पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत विश्वचषक खेळणार आहे. त्याने महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये ईगल नाशिक टायटन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती. यानंतर त्याने या मोसमातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून वरिष्ठ क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अलीकडेच, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्याच्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जकडे चाचणी घेण्याची शिफारस केली होती, परंतु अर्शीन अंडर-19 शिबिरामुळे चाचणीला मुकला. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब किंग्स या युवा खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करण्यास खूप उत्सुक आहे.
शुभम दुबे (Shubham Dubey)
विदर्भाचा डावखुरा खालच्या फळीतील फलंदाज शुभम दुबेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फिनिशर म्हणून आपली छाप पाडली आहे आणि अनेक आयपीएल संघांना प्रभावित केले आहे. त्याने यावर्षी सात टी-20 डावांत 187 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 221 धावा केल्या आहेत. बंगालविरुद्धच्या सामन्यात 213 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभावी खेळाडू म्हणून त्याने 20 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 58 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि संघाला 13 चेंडू राखून विजय मिळवून दिला.
मुशीर खान (Mushir Khan)
डावखुरा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू मुशीरला मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तो सध्या भारताच्या अंडर-19 विश्वचषक संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी कूचबिहार ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करताना त्याने 632 धावा केल्या होत्या आणि 32 बळीही घेतले होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावल्यानंतर त्याला मुंबई रणजी संघात स्थान मिळाले आणि तीन प्रथम श्रेणी सामने खेळले. या प्रतिभावान खेळाडूवर आयपीएल संघांची नक्कीच नजर असेल.
समीर रिझवी (Sameer Rizvi)
UP T20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्सकडून खेळताना 20 वर्षीय रिझवीने संघासाठी सर्वाधिक षटकार ठोकले होते. या स्पर्धेत त्याच्या नावावर दोन शानदार शतकांसह एकूण 455 धावांची नोंद झाली. यानंतर पंजाब किंग्जसह एकूण तीन आयपीएल संघांनी त्याला चाचण्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यूपी अंडर-23 संघात सामील झाल्यामुळे रिझवीला या चाचण्या सोडाव्या लागल्या. 23 वर्षांखालील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 65 चेंडूत 91 धावांची खेळी करून, त्याने आपल्या संघ उत्तर प्रदेशसाठी राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
कुमार कुशाग्र (Kumar Kushagra)
झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार कुशाग्रने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात 37 चेंडूत नाबाद 67 धावा खेळून आपल्या संघाला महाराष्ट्राविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवून दिला. कुशाग्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा संघाला 12.1 षटकात 104 धावांची गरज होती. त्याने कर्णधार सौरभ तिवारीसह तीन चौकार आणि पाच षटकारांसह अविश्वसनीय खेळी खेळली. जेव्हा कुशाग्र मैदानावर षटकार मारत होता, तेव्हा अनेक आयपीएल संघांचे स्काउट तेथे उपस्थित होते आणि ते त्याच्या निर्भीड खेळीने प्रभावित झाले होते. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाची गरज आहे आणि कुशाग्र नक्कीच उपयोगी पडू शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या