T20 World Cup | टी-20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा, हरमनप्रीत कौर कर्णधार
टी-20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा झाली आहे. विश्वचषकाच्या संघात युवा फलंदाज शेफाली वर्मावरही विश्वास दाखवला आहे.
मुंबई : आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी महिला क्रिकेट संघाची निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या टी-20 विश्वचषक सुरु होणार आहे, त्यासाठी 15 महिला खेळाडूंची आज घोषणा झाली आहे. टीम इंडियाच्या महिला संघाची धुरा हरमनप्रीत कौरच्या हाती असणार आहे. तर मराठमोळी स्मृती मनधाना उपकर्णधार असणार आहे.
विश्वचषकाच्या संघात निवड समितीने काही युवा फलंदाजांना संधी दिली आहे. रिचा घोषला संघात संधी मिळाली आहे. रिचा महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. एका सामन्यात तिने 26 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकून 36 धावा केल्या. शेफाली वर्मावरही विश्वास दाखवला आहे. अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी शेफालीला मिळाली आहे. सेफालीच्या टी-20 कारकिर्दिवर नजर टाकल्यास तिने 9 सामने खेळले आहेत. या 9 सामन्यामध्ये शेफालीने 142.30 च्या सरासरीने 222 धावा केल्या आहेत. तर 73 ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
टी-20 विश्वचषकाचं आयोजन ऑस्ट्रेलियात होत आहे. पुढच्या महिन्यात 21 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा पहिलाच सामना तगड्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि थायलंड हे संघ सहभागी होणार आहेत.
भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मनधाना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तान्या भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रॉय
Harmanpreet Kaur to lead India at the T20 World Cup in Australia. Opener Smriti Mandhana will be the vice captain. The tournament will be held between 21st February and 8th March 2020 pic.twitter.com/BVluIuQALx
— ANI (@ANI) January 12, 2020