(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी आजपासून
इंग्लंड दौऱ्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतलं आव्हान राखायचं, तर टीम इंडियासाठी ही कसोटी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड संघांमधील तिसऱ्या कसोटी सामन्यातला आजपासून नॉटिंगहॅमच्या ट्रेन्टब्रिजवर सुरुवात होत आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतलं आव्हान राखायचं, तर टीम इंडियासाठी ही कसोटी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
भारतानं एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटीत 31 धावांनी, तर लॉर्डसच्या दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि 159 धावांनी लाजिरवाणी हार स्वीकारली. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघात समतोल नसल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाला तिसऱ्या कसोटीसाठी अंतिम अकरा जणांत योग्य मेळ साधावा लागणार आहे. या परिस्थितीत अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला संधी मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आजच्या सामन्यात भारतीय संघात बदल निश्चित दिसतील असा अंदाज वर्तवला जात आहे. यष्टीरक्षक वृद्धिमान सहाच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आलं होतं, मात्र त्यालाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. कार्तिकने दोन सामन्यात केवळ 21 धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत २० वर्षीय ऋषभ पंतला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
तसेच जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहचा संघात समावेश होऊ शकतो. पहिल्या दोन कसोटी सामन्यात फिट नसल्याने बुमराहला बाहेर बसावं लागलं होतं. मात्र आता तो फिट असल्याने गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी तो सज्ज आहे.