IND vs AUS 3rd Test 3rd Day : दिवसअखेर टीम इंडियाकडे 346 धावांची आघाडी
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्टेलियन खेळाडू टिकू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 3 विकेट घेतल्या आहेत. तर रवींद्र जाडेजाने 2 आणि इशांत शर्माने 1 विकेट घेतली आहे.
मेलबर्न : मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी असूनही फॉलोऑन न देता खेळणाऱ्या टीम इंडियाची दुसऱ्या डावात पाच बाद 54 अशी दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयांक अगरवाल 28 तर रिषभ पंत सहा धावांवर खेळत होता. या सामन्यात भारताच्या हाताशी आता एकूण 346 धावांची भक्कम आघाडी जमा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं दुसऱ्या डावात टीम इंडियाची सुरुवातीची फळी कापून काढली. त्यानं हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर जोश हेजलवूडनं रोहित शर्माला माघारी धाडत टीम इंडियाला पाचवा धक्का दिला.
ऑस्ट्रेलियाच घसरगुंडी
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावांत संपुष्टात आला आहे. तर टीम इंडियाला 292 धावांनी आघाडी मिळाली आहे. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. इशांत, जाडेजा आणि शमीनेही बुमराहला चांगली साथ दिली. बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या 6 खेळाडूंना माघारी धाडलं. जाडेजाने 2 तर शमी आणि इशांतने प्रत्येकी एक विकेट घेतली.
पहिल्या सत्रात सलामीवीर फिंच 8 धावांवर माघारी परतला. त्याच्यापाठोपाठ हॅरिस 22 तर ख्वाजा 21 धावा करून तंबूत परतले. शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण उपहाराच्या विश्रांतीआधी शेवटच्या चेंडूवर मार्श 19 धावांवर बाद झाला. तर, ट्रेव्हिस हेड 20 धावांवर बाद झाला.
मिशेल मार्श 9 धावांवर, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन 22 धावांवर बाद झाला. काल भारतानं पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. त्यामुळे अजूनही भारत मजबूत स्थितीत असल्याचं चित्र आहे.
दुसरा दिवस
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियानं पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. पुजारानं कसोटी कारकीर्दीतलं आपलं सतरावं शतक साजरं केलं. त्यानं 10 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तर कर्णधार कोहलीनं नऊ चौकारांसह 82 धावांचं योगदान दिलं.
पुजारा आणि विराटनं तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मानंही 63 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं तीन आणि मिचेल स्टार्कनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर नॅथन लायन आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात बिनबाद आठ धावांची मजल मारली होती.