Suryakumar Yadav : 256 धावांचा डोंगर, 72 धावांनी विजय... तरीही सूर्यकुमार यादव खेळाडूंवर चिडला, नेमकं काय घडलं?, सामन्यानंतर स्पष्ट बोलला
Suryakumar Yadav Statement On India Win vs ZIM : या विजयामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा केवळ जिवंत राहिल्या नाहीत, तर संघाचा आत्मविश्वासही अक्षरशः सातव्या आसमानावर पोहोचला आहे.

India Win vs ZIM T20 World Cup 2026 : सुपर-8 फेरीतील झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव थोडा समाधानी दिसला. या विजयामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा केवळ जिवंत राहिल्या नाहीत, तर संघाचा आत्मविश्वासही अक्षरशः सातव्या आसमानावर पोहोचला आहे. सामन्यानंतर सूर्यानं मोठं वक्तव्य करत वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीपूर्वी महत्त्वाचा संदेश दिला.
रणनीतीबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादव का म्हणाला?
सामन्यानंतर आपल्या रणनीतीबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “आम्हाला मागचं सगळं विसरून पुढे जायचं होतं. लीग स्टेजमध्ये किंवा अहमदाबादमधील मागील सामन्यात काय झालं, याचा आम्ही जास्त विचार केला नाही. आमच्या व्हिडिओ विश्लेषकाने फलंदाज आणि गोलंदाजांसाठी एक खास सादरीकरण तयार केलं होतं. त्यामध्ये गेल्या वर्षभरातील आमच्या सर्वोत्तम कामगिरीचे क्षण दाखवले होते. ते पाहून आम्हाला एनर्जी मिळाली आणि पूर्ण स्पष्टतेने आम्ही मैदानात उतरलो.”
गोलंदाजीबाबत सूर्या स्पष्ट
संघाच्या संतुलित कामगिरीचं कौतुक करताना सूर्यानं गोलंदाजीमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचंही मान्य केलं. तो म्हणाला, “पहिल्या क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकापर्यंत सर्व फलंदाजांनी योगदान दिलं. त्यामुळे आमच्या कामगिरीत फारशी उणीव वाटली नाही. मात्र प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर गोलंदाजीमध्ये आपण थोडे अधिक अचूक राहू शकलो असतो. तरीही शेवटी विजय महत्त्वाचा असतो. वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरताना या छोट्या चुका नक्कीच दुरुस्त करू.”
‘करो किंवा मरो’साठी सज्ज
झिम्बाब्वेच्या फलंदाजांचं कौतुक करत सूर्यानं संघाला आगामी निर्णायक लढतीसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचा सल्ला दिला. “अशा परिस्थितीत निर्णय घेताना धाडस दाखवावं लागतं. सकारात्मक दृष्टिकोन निवडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता कोलकात्यात पोहोचल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याची आखणी करू. सध्या एक दिवस विश्रांती घेऊन प्रवास करत रिलॅक्स होण्याची गरज आहे,” असं तो म्हणाला.
भारताची आतापर्यंतची कामगिरी
या स्पर्धेत भारताने एकूणच दमदार कामगिरी केली आहे. सुपर-8 मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, त्याआधी गट फेरीतील सर्व चार सामने भारताने जिंकले होते. अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांचा शानदार विजय मिळवत भारतीय संघाने पुनरागमन केले आणि सेमीफायनलची लढत अधिक रंगतदार केली आहे. आता 1 मार्चला कोलकात्यातील ऐतिहासिक मैदानावर होणाऱ्या निर्णायक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे.
हे ही वाचा -





















