(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS 3rd Test : पहिल्या दिवसअखेर भारत दोन बाद 215 धावा
भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्नाटकच्या मयांक अगरवालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
मेलबर्न : टीम इंडियाने मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर दोन बाद 215 धावांची मजल मारली आहे. मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकांचा यामध्ये समावेश आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार कोहली 47 तर पुजारा 68 धावांवर खेळत होता. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 92 धावांची अभेद्य भागीदारी आणि पदार्पणवीर मयांक अगरवालची अर्धशतकी खेळी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. मयांकनं आठ चौकार आणि एका षटकारासह 76 धावांची खेळी उभारली.
मयांकनं पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी साकारुन भारतीय डावाचा पाया रचला. त्यानंतर विराट आणि पुजाराच्या भागिदारीनं टीम इंडियाला पहिल्या दिवशी समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली.
सलामीचा हनुमा विहारी आठ धावा काढून माघारी परतल्यानंतर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला. दरम्यान त्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्नाटकच्या मयांक अगरवालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मेलबर्नची ही तिसरी कसोटी दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. भारतानं अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत 31 धावांनी विजय साजरा केला होता. तर ऑस्ट्रेलियानं पर्थची कसोटी 146 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात तीन बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर मुरली विजय आणि लोकेश राहुलला वगळून मयांक अगरवालला खेळवण्याचा निर्णय संघव्यवस्थापनानं घेतला आहे. याशिवाय रोहित शर्माचं आणि रविंद्र जाडेजाचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवला विश्रांती देऊन जाडेजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.