ICC World cup 2019 INDvsAUS : भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी धुव्वा, शिखर धवनचं शतक
टीम इंडियानं या सामन्यात 50 षटकांत पाच बाद 352 धावांचा डोंगर उभारला. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यातला उच्चांक ठरला. या सामन्यात शिखर धवनच्या शतकाला रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार फलंदाजीची मिळालेली जोड टीम इंडियाला लाभदायक ठरली.
लंडन : टीम इंडियानं विश्वचषकाच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात करुन सलग दुसरा विजय साजरा केला. भारताचा विश्वचषक इतिहासातला ऑस्ट्रेलियावरचा हा चौथा विजय ठरला. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 353 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंनी सर्वबाद 316 धावांची मजल मारली.
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि अॅलेक्स कॅरीनं अर्धशतकं झळकावली. पण तरीही ऑस्ट्रेलियाचा विजय 36 धावांनी दूर राहिला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर यजुवेंद्र चहलनं दोन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्हन स्मिथने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. डेविड वॉर्नरने 56, अॅलेक्स कॅरे 55 उस्मान ख्वाजाने 42 धावांची खेळी केली. मात्र भारताचं दिलेलं लक्ष्य गाठणे ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांना शक्य झालं नाही.
त्याआधी टीम इंडियानं या सामन्यात 50 षटकांत पाच बाद 352 धावांचा डोंगर उभारला. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यातला उच्चांक ठरला. या सामन्यात शिखर धवनच्या शतकाला रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार फलंदाजीची मिळालेली जोड टीम इंडियाला लाभदायक ठरली.
शिखर धवनने 117 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर विराट कोहलीने 82, रोहित शर्माने 57, हार्दिक पंड्याने 48 धावांची खेळी केली. शेवटच्या क्षणी आलेल्या धोनीनेही 14 चेंडूत 27 धावांची खेळी केली. याआधी टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातली सर्वोत्तम धावसंख्या सहा बाद 289 ही होती. 1987 सालच्या विश्वचषकात नवी दिल्लीत भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ही मजल मारली होती.