Haryana Vidhansabha Election Results 2024: काँग्रेसच्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरला; हरियाणातील अनिरुद्ध चौधरी आघाडीवर की पिछाडीवर?
Haryana Election Results: वीरेंद्र सेहवाग मागील काही दिवसांपासून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना दिसला आहे.
Haryana Vidhansabha Election Results 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान (Haryana VidhanSabha Election Results) काँग्रेसचा प्रचार करताना दिसला. हरियाणातील तोशाम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अनिरुद्ध चौधरी रिंगणात आहेत. अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी वीरेंद्र सेहवाग मते मागताना दिसला. विशेष म्हणजे अनिरुद्ध चौधरी यांच्याविरोधात भाजपकडून त्यांची चुलत बहीण श्रुती चौधरी या उमेदवार आहे. सध्या हाती आलेल्या कलानूसार अनिरुद्ध चौधरी पिछाडीवर आहे. तर श्रुती चौधरी 2610 मतांनी आघाडीवर आहे.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मागील काही दिवसांपासून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना दिसला आहे. त्यामुळे वीरेंद्र सेहवाग राजकारणात एन्ट्री करत नवीन इनिंग सुरु करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. वीरेंद्र सेहवागने हरियाणा विधानसभेच्या (Haryana VidhanSabha Election Results 2024) रिंगणात असलेले काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी मते मागताना पाहायला मिळाला. अनिरुद्ध चौधरी हे तोशाम या विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. 48 वर्षीय अनिरुद्ध चौधरी यांना निवडणुकीत त्यांच्याच कुटुंबातील सदस्याचे आव्हान आहे. त्यांची चुलत बहीण श्रुती चौधरी या भाजपाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढाई एकाच कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये होत आहे. त्यामुळे हरियाणातील तोशाम मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अनिरुद्ध चौधरी जिंकल्यास ते लोकांना नाराज करणार नाही- वीरेंद्र सेहवाग
विरेंद्र सेहवाग आणि अनिरुद्ध चौधरी यांची जुनी ओळख आहे. दोघेही जेव्हा भेटतात, तेव्हा क्रिकेटपेक्षा वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चा होते. अनिरुद्ध चौधरी आपल्यासाठी मोठ्या भावासमान असल्याच विरेंद्र सेहवाग म्हणाला. अनिरुद्ध चौधरी यांनी जनतेला जी आश्वासने दिली आहेत, ती ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास वीरेंद्र सेहवागने बोलताना व्यक्त केला. अनिरुद्ध चौधरी निवडणूक जिंकले, तर जनतेला ते नाराज करणार नाही असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.
भाजपा आघाडीवर-
दरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंतच्या मतमोजणीच्या कलानुसार 90 जागा असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजप 50, काँग्रेस 34, लोक दल 1 आणि 5 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत 46 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे भाजपकडे एकहाती बहुमत आहे. पुढील काही तासांमध्ये भाजपच्या जागा घटल्या तरी त्यांना अपक्षांची मदत मिळू शकते. आघाडीवर असलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी बहुतांश भाजपचे बंडखोर आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी गरज पडल्यास हे बंडखोर भाजपलाच साथ देतील, असा अंदाज आहे.