चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी धुव्वा, चेन्नईची गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप
इम्रान ताहिरनं चार आणि रवींद्र जाडेजानं तीन फलंदाजांना माघारी धाडून, दिल्लीचा अख्खा डाव अवघ्या 99 धावांत गुंडाळला.
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. चेन्नई आणि दिल्लीचं आयपीएलच्या प्ले ऑफचं तिकीट आधीच कन्फर्म झालं आहे. या दोन संघांमधला सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली.
आजच्या सामन्यात चेन्नईनं दिल्लीला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इम्रान ताहिरनं चार आणि रवींद्र जाडेजानं तीन फलंदाजांना माघारी धाडून, दिल्लीचा अख्खा डाव अवघ्या 99 धावांत गुंडाळला. दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ आजच्या सामन्यातही अपयशी ठरला. तो अवघ्या 4 धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी झुंज दिली. मात्र तोही 44 धावांवर बाद झाला. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर वगळता एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या उभारत आली नाही.
त्याआधी, सुरेश रैनानं 59, महेंद्रसिंग धोनीनं नाबाद 44 आणि फॅफ ड्यू प्लेसीनं 39 धावांची खेळी केली. तर शेवटच्या क्षमी रवींद्र जाडेजाने 10 चेंडूत 25 धावांची महत्त्वाची खेळी करुन चेन्नईला चार बाद 179 धावांची मजल मारुन दिली होती. दिल्लीकडून जगदीश सुचितने 2 तर ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेल जोडीने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली