(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा नाद करायचा नाय! 700 गोल करणारा जगातील पहिलाच खेळाडू
English Premier League: ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रविवारी रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण केले.
Cristiano Ronaldo's Record : जगातील एक प्रसिद्ध खेळ म्हणजे फुटबॉल आणि या प्रसिद्ध खेळातील प्रसिद्ध खेळाडू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo). क्लब फुटबॉलपासून ते आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपल्या दमदार खेळाने अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या रोनाल्डोने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. त्याने क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण करत एक नवा विक्रम केला आहे. रविवारी इंग्लिश प्रिमियर लीग (English Premier League) स्पर्धेत रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत रोनाल्डोने क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण केले.
37 वर्षीय रोनाल्डोने 20 वर्षांपूर्वी स्पोर्टिंग लिस्बन क्लबकडून क्लब फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. या 20 वर्षांत त्याने स्पोर्टिंग लिस्बनसोबत मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रीद, युव्हेंटस अशा वेगवेगळ्या क्लबकडून खेळत तब्बल 944 सामन्यांत 700 गोल पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
कोणत्या क्लबसाठी किती गोल?
रोनाल्डोने पोर्तुगालचा फुटबॉल क्लब स्पोर्टिंग लिस्बनसाठी 5 गोल केले असून तो जास्तकाळ या संघाकडून खेळलाच नाही. एका सीजननंतरच तो मँचेस्टर युनायटेडमध्ये गेला. त्याने मँचेस्टर युनायटेडमधून खेळताना एकून 144 गोल केले. (यामध्ये सध्या तो खेळत असलेले गोलही सामिल आहेत). त्यानंतर तो स्पेनचा प्रसिद्ध क्लब रिअल माद्रीदमध्ये सामिल झाला. या संघासाठी त्याने तब्बल 450 गोल केले, यावेळी माद्रीदसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याने केला. त्यानंतर इटालियन क्लब युव्हेंटससाठी रोनाल्डो खेळू लागला, यावेळी 101 गोल त्याने केले आणि पुन्हा तो मँचेस्टर युनायटेड संघात परतला आहे.
50 वेळा केलीये हॅट्रिक
आतापर्यंतच्या क्लब फुटबॉलमध्ये रोनाल्डोने एकूण 50 वेळा हॅट्रिक केली आहे. दरम्यान 700 गोलमधील 129 गोल हे त्याने पेनल्टीच्या मदतीने केले आहेत. तो चॅम्पियन्स लीगमधील ही टॉप गोलस्कोरर राहिला आहे. त्याने 183 सामन्यात 140 गोल केले आहेत.
2024 पर्यंत खेळम्याचा निश्चय
रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू देखील आहे. त्याने पोर्तुगालसाठी 189 सामन्यात 117 गोल केले आहेत. अलीकडेच बोलताना रोनाल्डो म्हणाला,''सध्यातरी फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही आणि युरो 2024 पर्यंत त्याला आपल्या देशासाठी खेळायचे आहे.''
हे देखील वाचा-