Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
पुणे : मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला आता नवा मुहूर्त मिळाला आहे. येत्या रविवारी, 29 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहेत.
पुणेकरांच्या दिमतीला आणखी एक मेट्रो येणार आहे. जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होतं. मात्र पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला आणि मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडलं. मात्र पुणे मेट्रोसाठी उद्घाटनाची औपचारिकता हवीच कशाला? असा सवाल करत मेट्रो सुरू करायला हवी, अशी मागणी पुणेकरांनी सुरू केली. त्यानंतर आता रविवारी या मेट्रोचं उद्धाटन करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे 3.62 किलोमीटरचे अंतर आहे.