ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकून रोहित शर्माची खास क्लबमध्ये एन्ट्री!
ENG vs IND: मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर (Emirates Old Trafford) खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला.

ENG vs IND: मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर (Emirates Old Trafford) खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं 2-1 नं मालिका जिंकली. तब्बल आठ वर्षानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघानं इंग्लंडच्या मायभूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या कामगिरीसह रोहित शर्मानं खास क्बलमध्ये एन्ट्री केलीय. इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत करणारा रोहित शर्मा चौथा भारतीय कर्णधार ठरलाय.
रोहित शर्माची खास क्लबमध्ये एन्ट्री
इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर एकदिवसीय मालिकेत भारतीय संघानं तीन वेळा विजय मिळवला होता. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं 1986 मध्ये पहिल्यांदाच इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर नमवलं होतं. त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीननं 1990 आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2014 मध्ये इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीवर पराभूत केलं. त्यानंतर आठ वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं चौथ्यांदा हा पराक्रम केलाय.
मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा पराभव करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतानं मँचेस्टरमध्ये चार सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताला एकच सामना जिंकता आला होता. कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात या मैदानावर भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर भारताच्या कोणत्याही कर्णधाराला मँचेस्टर येथे एकदिवसीय सामना जिंकता आला नाही. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं 39 वर्षानंतर मँचेस्टर मैदानावर विजय मिळवला आहे.
भारताचा पाच विकेट्नं विजय
हार्दिक पांड्या ऋषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं.
हे देखील वाचा-




















