Ranji Trophy: रणजी ट्रॉफीत धावांचा पाऊस, एकात दिवशी तीन त्रिशतकं, गोवा विरुद्ध अरुणाचल प्रदेश सामन्यात नव्या विक्रमांची नोंद
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत आज अनेक विक्रमांची नोंद झाली. महिला लोमरोर, स्नेहल कौथंकर आणि कश्यप बाकले या तिघांनी त्रिशतक झळकावलं.
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. विविध राज्यांमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. आज रणजी ट्रॉफीत अनेक विक्रमांची नोंद झाली. आजच्या दिवशी तीन त्रिशतकांची नोंद झाली. राजस्थान विरुद्ध उत्तराखंड, गोवा विरुद्ध अरुणाचल प्रदेश या सामन्यांमध्ये त्रिशतकांची नोंद झाली.
राजस्थानचा खेळाडू महिला लोमरोर यानं उत्तराखंड विरुद्ध खेळताना त्रिशतक केलं. लोमरोरनं 360 बॉलमध्ये 300 धावा केल्या. त्यानं 25 चौकार आणि 13 षटकार मारले. महिपाल लोमरोरची ही प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दमदार कामगिरी आहे.
गोवा आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना सुरु आहे. गोवा संघाच्या कश्यप बाकले आणि स्नेहल कौथंकर या दोघांनी त्रिशतक झळकावलं. कश्यप बाकले यानं 269 बॉलमध्ये 300 धावा केल्या. तर, स्नेहल कौथंकर यानं 215 बॉलमध्ये नाबाद 314 धावा केल्या. याच सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली.
गोवा संघानं केले अनेक विक्रम
गोवा विरुद्ध अरुणाचल प्रदेश या मॅच अनेक विक्रमांची नोंद झाली. अरुणाचल प्रदेशचा संघ पहिल्या डावात 84 धावांवर बाद झाला. यानंतर गोवा संघानं पहिल्या डावात 89 ओव्हरमध्ये 2 बाद 715 धावा केल्या. गोवा संघानं 7.94 च्या रनरेटनं धावा केल्या. दोघांनी रणजी ट्रॉफीतील तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारी 607 धावा अशी केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील मॅचमध्ये 594 धावांची भागिदारी झाली होती. स्वप्नील गुगले आणि अंकित बावणे यांच्यातील ती भागिदारी होती. गोवा संघाकडून खेळताना कश्यप बाकले आणि स्नेहल कौथंकर या दोघांनी 448 बॉलमध्ये 606 धावांची भागिदारी केली.
यंदाच्या रणजी ट्रॉफीत चार त्रिशतकांची नोंद
रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत चार त्रिशतकांची नोंद झाली आहे. ही चार त्रिशतकं स्नेहल कौथंकर, कश्यप बाकले, महिपाल लोमरोर आणि चेतन बिस्ट यांनी केली आहेत. चेतन बिस्ट यानं नागालँड विरुद्ध मिझोरम या मॅचमध्ये त्रिशतक केलं होतं.
रणजी ट्रॉफीत मोहम्मद शमीचं कमबॅक
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर होता. मोहम्मद शमी पायाच्या दुखापतीमुळं क्रिकेटपासून दूर होता. रणजी ट्रॉफीत बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश लढतीच्या माध्यमातून मोहम्मद शमीनं कमबॅक केलं आहे. मोहम्मद शमीनं पहिल्या डावात मध्य प्रदेशच्या चार विकेट घेतल्या आहेत. आता हा सामना संपल्यानंतर मोहम्मद शमीचा फिटनेस तपासला जाईल. तो तंदुरुस्त असल्यास किंवा त्याला कोणताही त्रास होत नसल्यास टीम इंडियाची दारं उघडली जाऊ शकतात.
इतर बातम्या :
धोनी, कोहलीमुळे माझ्या मुलाची 10 वर्षे वाया गेली, संजू सॅमसनच्या वडिलांच्या गंभीर आरोपामुळे खळबळ!