Mohammed Shami:मोहम्मद शमीचं दमदार कमबॅक, रणजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 4 विकेट घेत धमाका, ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळणार?
Mohammed Shami : मोहम्मद शमी भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपनंतर दुखापत झाल्यानं क्रिकेटपासून दूर होता. आज त्यानं बंगालकडून रणजी स्पर्धेत कमबॅक केलं आहे.
मुंबई: टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताला मायदेशात 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. यामुळं भारताच्या संघासमोर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं जवळपास एका वर्षानंतर मैदानावर कमबॅक केलं आहे. मोहम्मद शमीनं बंगालकडून खेळताना मध्य प्रदेशविरुद्ध 19 ओव्हर गोलंदाजी केली. यामध्ये शमीनं 54 धावा देत 4 विकेट घेतल्या.
मोहम्मद शमीनं इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रणजी ट्रॉफीच्या सामन्यात चार विकेट घेतल्या. मोहम्मद शमीला सामन्याच्या पहिल्या दिवशी यश मिळालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्यानं मध्य प्रदेशच्या चार विकेट घेतल्या.
मोहम्मद शमीनं मध्य प्रदेश विरुद्ध 19 ओव्हरमध्ये गोलंदाजी केली, पहिल्या चार ओव्हरमध्ये त्यानं एकही रन दिली नव्हती. शमीनं 2.80 रन रेटनं धावा दिल्या. मोहम्मद शमीनं इंदौरमध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीनं ऑस्ट्रेलियात असलेल्या टीम इंडियाला दिलासा मिळणार आहे.
मोहम्मद शमीनं टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 19 नोव्हेंबर 2023 ला खेळला होता. ती मॅच वनडे वर्ल्ड कप फायनलची होती. त्यानंतर दुखापतीमुळं मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर आहे.
मोहम्मद शमीच्या पायावर सर्जरी करण्यात आली होती, त्यामुळं त्याला कमबॅक करण्यासाठी वेळ लागला होता. दुखापतीतून सावरत असताना पायाला सूज असल्यानं अधिकचा वेळ लागला होता. मोहम्मद शमीनं पहिल्या डावात 4 विकेट घेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिली कसोटी वगळता उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.
मोहम्मद शमीनं मध्यप्रदेशचा कॅप्टन शुभम शर्मा, सारांश जैन यासह इतर दोघांना बाद केलं. मोहम्मद शमीनं चार विकेट घेतल्या त्यापैकी तीन खेळाडूंना बोल्ड आऊट केलं.
मोहम्मद शमी मध्य प्रदेशच्या दुसऱ्या डावात कशी गोलंदाजी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतीय संघाच्या निवड समितीचं लक्ष देखील लागलं आहे.इंदौरमधील मॅचनंतर मोहम्मद शमीला कोणता त्रास न झाल्यास भारतीय संघासाठी चांगली बातमी आहे.
मध्य प्रदेश विरुद्धची मॅच 16 नोव्हेंबरला संपणार आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
इतर बातम्या :
धोनी, कोहलीमुळे माझ्या मुलाची 10 वर्षे वाया गेली, संजू सॅमसनच्या वडिलांच्या गंभीर आरोपामुळे खळबळ!
अक्षर पटेलचा अप्रतिम झेल, डेव्हिड मिलर अवाक्; सामनाही क्षणात फिरला, नेमकं काय घडलं?, पाहा Video