IND vs SA 1st Test : दुसऱ्या दिवशीचा खेळ तर रद्द झाला, आता तिसऱ्या दिवशी कसा असेल खेळ?
IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला आहे.
IND vs SA 1st Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघात (India vs South Africa) सध्या पहिला कसोटी सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन मैदानात हा सामना सुरु असून पहिल्या दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली. केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने 3 बाद 272 धावा केल्या. पण दुसऱ्या दिवशी ही आघाडी वाढवता आली नाही कारण पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळच होऊ शकला नाही. आता तिसऱ्या दिवशीचा खेळ होईल का? आणि कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पहिल्या दिवशीचा खेळ संपताना के. एल. राहुल ( KL Rahul) 122 आणि अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane ) 40 धावांवर नाबाद राहिले. दक्षिण आफिकेच्या लुंगी एनिग्डीने तीन विकेट घेतल्या आहेत. पण दुसऱ्या दिवशी आधी खराब सूर्यप्रकाश तसचं रिमझीम पाऊस यामुळे खेळ सुरुच करता आला नाही. अखेर साडेपाच वाजण्याच्या सुमारात दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला. त्यामुळे भारत एक मोठी धावसंख्या उभी करु शकलेला नाही. दरम्यान आता तिसऱ्या दिवशी वातावरण कसं असेल? हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. तर आफ्रिकेच्या हवामान संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पाऊस होणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. एक्यूवेदर या वेबसाईटनुसार मंगळवारी सेंचुरियन मैदानातील वातावरण साफ असणार आहे.
टीम इंडियाला वेगवान पण सावध खेळ दाखवणं गरजेचं
तिसऱ्या दिवशी पाऊस न होण्याची दाट शक्यता असली तरी भारतीय खेळाडूंना एक मोठी धावसंख्या उभी कऱण्यासाठी काहीसा वेगवान आणि सावध खेळ दाखवणं गरजेचं आहे. आता कसोटीचा एक दिवस वाया गेल्याने भारताला वेगवान खेळ दाखवून विजय मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: