Asia Cup 2022 : आशिया चषकात मोहम्मद शमीला स्थान न दिल्याने रवी शास्त्री भडकले, म्हणाले....
Team India Asia Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वात अनेक नव्या दम्याच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले. तर काही अनुभवी खेळाडूंना आशिया चषकात स्थान देण्यात आलं नाही
Team India Asia Cup 2022 : पाकिस्तान आणि श्रीलंकाविरोधात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचं आशिया चषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. काही दिवसांत टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी भारतीय संघातील अनेक कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. यावरुन माजी खेळाडूंनी टीम इंडियावर सडकून टीका केली. डेथ ओव्हरमधील गोलंदाजी, ही प्रमुख अडचण भारतीय संघाची असल्याचं समोर आलंय. भारतीय संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर अनेकांना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आठवण आली. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमीला भारतीय संघात स्थान द्यायला हवं होतं, असे अनेकांना वाटत आहे. मोहम्मद शमीला टीम इंडियात स्थान न दिल्यामुळे माजी कोच रवी शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात अनेक नव्या दम्याच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले. तर काही अनुभवी खेळाडूंना आशिया चषकात स्थान देण्यात आलं नाही. आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघावर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विशेषकरुन वेगवान गोलंदाजीच्या निवडीवरुन टीम मॅनेजमेंटवर निशाणा साधण्यात आला होता. याचं प्रमुख कारण, मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज संघात नसणे... समालोचन करताना रवी शास्त्री यांनी या विषयावर आपलं परखड मत व्यक्त केलेय.
रवी शास्त्री काय म्हणाले?
“जर तुम्हाला जिंकायचं आहे, तर तुम्हाला चांगली तयारी करावी लागते. टीम सिलेक्शन यापेक्षा चांगली होऊ शकलं असते. विशेषकरुन वेगवान गोलंदाज... तुम्हाला माहितेय, दुबईसारख्या खेळपट्टीवर येथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही. येथे वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. अशा परिस्थितीत फक्त चार वेगवान गोलंदाजांसह तुम्ही आला होतात. त्यामधील हार्दिक पांड्या हा एक गोलंदाज होय... मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजाला घरी बसावे लागले, हे आठवून मला राग येतोय. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही शमीला संघाबाहेर ठेवणं, न समजण्यापलीकडील आहे.”
विश्वचषकाआधी भारतीय संघ उणिवा दूर करणार का?
युएईतल्या आशिया चषकात ठळकपणे दिसून आलेल्या भारतीय संघातल्या उणिवा जादूची कांडी फिरवल्यासारख्या तातडीनं दूर करता येणार नाहीत. पण ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आव्हान लक्षात घेता या उणिवांवर उपाययोजना करण्यासाठी बीसीसीआयच्या हाताशी केवळ एकच महिना आहे. ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाला गेल्या काही वर्षांत वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांवर आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळंच विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आता आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे विश्वचषकांत भारताच्या कामगिरीत सुधारणा करायची असेल, तर बीसीसीआय आणि सीनियर निवड समितीलाही आपल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे.