Russia-Ukraine War : रशियाला मदत केली...भारतावर निर्बंध लागू करा; युक्रेनची अमेरिकेकडे मागणी
Russia-Ukraine War : रशियाकडून इंधन खरेदीकडून पुतीन यांना बळ देणाऱ्या भारत आणि चीनवर निर्बंध लागू करण्याची मागणी युक्रेनच्या खासदारांनी केली.
Russia-Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. युक्रेनला पाश्चिमात्य देशांसह अमेरिकेने मदतीचा हात दिला आहे. तर, रशियावर निर्बंध लादले आहेत. अशातच रशियाकडून इंधन-ऊर्जा खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनवर अमेरिकेने निर्बंध लागू करण्याची मागणी युक्रेनच्या खासदाराने मागणी केली आहे. युक्रेनच्या संसदेत परराष्ट्र व्यवहार समितीचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याने भारतावर निर्बंध लागू करताना दुसरीकडे तैवानशी अधिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनचे ज्येष्ठ खासदार अलेक्झांडर मेरेझको यांनी म्हटले की, आपण भारतात, दिल्लीत वास्तव्यास होतो. मात्र, भारताने रशियाकडून इंधन खरेदीचा निर्णय घेणे हा दुख:द निर्णय होता, असे त्यांनी म्हटले. परंतु युद्ध संपुष्टात येत नसल्यामुळे, अशा राष्ट्रांनी "रशियन अर्थव्यवस्था आणि रशियन लष्कराला वित्तपुरवठा" करत असल्याचा दावा करत खरेदीदारांवरील निर्बंधांचे समर्थन देखील केले. लोकशाही - मुक्त जग - आणि हुकूमशाही शासन यांच्यातील हा जागतिक संघर्ष आहे. भौतिक आर्थिक हितसंबंधांमुळे कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रिफायनर्सनी त्यांच्या रशियन तेल खरेदीचे पेमेंट संयुक्त अरब अमिरातीचे चलन UAE दिरहममध्ये भरण्यास सुरुवात केली. रशियन तेलाच्या खरेदीमुळे सध्या कोणत्याही निर्बंधांचे उल्लंघन होत नाही. बँका आणि वित्तीय संस्था अशा प्रकारे पेमेंट क्लिअर करण्याबद्दल अधिक सावध झाल्या आहेत ज्यामुळे इतर देशांविरुद्ध लादलेल्या अनेक उपायांचा भंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
भारतीय रिफायनीरी कंपन्या आणि व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर परली आहे रशियासोबतच्या कंपन्यांना एका ठाराविक मर्यादेत डॉलरमध्ये व्यवहार करण्यास परवनगी आहे. रशियाकडून आयात होणाऱ्या वस्तूंचे पेमेंट देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधानंतर रशियाच्या अर्थव्यवस्थेचे De Dollarization होण्यास मदत होणार आहे. यामुळे अमेरिकन डॉलरचे महत्त्व कमी करण्यास रशियाला मदत होणार आहे.
जवळपास वर्षभरापासून युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे. युक्रेनने नाटो देशाच्या गटात सामील होऊ नये आणि नाटो देशांनी रशियासोबत केलेला करार पाळावा अशी मागणी रशियाकडून केली जात होती. मात्र, युक्रेनने त्याला प्रतिसाद दिला नाही. परिणामी रशियाने युक्रेनविरोधात सैनिकी कारवाईस सुरुवात केली. या युद्धामुळे जगात महागाईचा आगडोंब उसळला. जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. अमेरिका आणि काही पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लागू केले होते. रशिया हा तेल उत्पादक देशांपैकी एक देश असल्याने या निर्बंधाने त्यांचे नुकसान झाले होते. मात्र, भारत, चीन आणि काही देशांनी रशियाकडून इंधन खरेदी करण्यास सुरुवात केली होती.