Hurricane Agatha : मेक्सिकोमध्ये 'अगाथा' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण बेपत्ता
Mexico Hurricane : मेक्सिकोमध्ये पुरामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. अनेक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता आहेत.
Hurricane Agatha Update : मेक्सिकोमध्ये (Mexico) 'अगाथा' या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. अगाथा चक्रीवादळामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर 20 जण अद्याप बेपत्ता आहेत. मेक्सिकोमधील दक्षिणेकडील ओक्साका शहराच्या राज्यपालांनी यांसंदर्भात माहिती दिली आहे. ओक्साका राज्याचे राज्यपाल मुरत यांनी अधिक माहिती देत सांगितलं की, 'सध्या सुमारे 20 लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी बहुतेक डोंगराळ भागातील आहेत.' मेक्सिकोमध्ये वादळामुळे खूप नुकसान झालं आहे. या वादळामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ओक्साकाचे राज्यपाल अलेजांद्रो मुरत यांनी सांगितलं की, पुरामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. अनेक लोक दलदलीच्या आणि खडकांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
10 लोकांचा मृत्यू अनेक लोक बेपत्ता
या वादळामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यपाल अलेजांद्रो मुरत यांनी स्थानिक मीडियाला माहिती दिली आहे की, 'पूर आणि भूस्खलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले बहुतेक लोक डोंगराळ भागातील अनेक लहान-लहान शहरांमधील होते.' ओक्साका नागरी संरक्षण कार्यालयाने माहिती दिली आहे की, सांता कॅटरिना टेकडीचा काही भाग कोसळल्यानं 18 आणि 21 वर्षे वयोगटातील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
लॅनो डेल चिल्लर येथे भूस्खलनात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा जखमी झाला, अशी माहिती समोर आलं आहे. साधारणपणे मे आणि नोव्हेंबर महिन्यांदरम्यान मेक्सिकोला पॅसिफिक आणि अटलांटिक दोन्ही किनारपट्टीवर उष्णकटिबंधीय वादळांचा नियमितपणे फटका बसतो.
वादळाचा प्रभाव कमी झाला
मेक्सिकोमध्ये 'अगाथा' चक्रीवादळामुळे ताशी 105 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मात्र, आता हे वादळ कमकुवत झालं आहे. अगाथा चक्रीवादळ मंगळवारी वेराक्रूझ राज्याकडे वळले आहे. सध्या बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या