भारताशी शत्रूत्व घ्यायचं नाही, बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करावी; मोहम्मद युनूस यांची मागणी
Muhammad Yunus Appeal To India : भारत हा बांगलादेशचा कायमच मित्र राहिला असून भारताशी शत्रूत्व घ्यायचं नाही असं मत नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी व्यक्त केलं.
नवी दिल्ली : बांगलादेशात लोकशाही परतणं गरजेचं आहे आणि या संकटकाळात भारताने पाठीशी खंबीर उभं राहावं असं मत नोबेल विजेते मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी म्हटलंय. मोहम्मद युनूस हे बांगलादेशमधील हंगामी सरकारचे सल्लागार असतील अशी चर्चा आहे. त्यांनी त्यासाठी होकारही कळवलाय अशी माहिती आहे. बांगलादेशात निवडणूक प्रक्रियेतून शेख हसिना यांनी अन्य विरोधी पक्षांना डावललं त्यामुळेच ही स्थिती आली असं मत मोहम्मद युनूस यांनी व्यक्त केलं आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी निवडणुकीत इतर राजकीय पक्षांना सहभागी होऊ देण्यास नकार दिला, त्यामुळे बांगलादेशात हिंसाचार निर्माण झाली असं मोहम्मद युनूस म्हणाले. अशा परिस्थितीत भारताने बांगलादेशच्या पाठीशी उभं रहायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारत हा बांगलादेशचा कायमच मित्र राहिला आहे, आता भारताशी शत्रूत्व घ्यायचं नाही असं मोहम्मद युनूस यांनी म्हटलं.
बांग्लादेशमध्ये जाळपोळ सुरूच
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडलं आहे. सध्या देशाची कमान बांगलादेश लष्कराच्या हाती आहे. नवीन सरकार स्थापनेची तयारीही सुरू झाली असून त्याचे मुख्य सल्लागार हे मोहम्मद युनूस असतील अशी माहिती आहे.
दरम्यान, बांगलादेशात आंदोलकांकडून बंगबंधू भवनाला आग लावण्याचा प्रयत्न झाला. याच परिसरात असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचीही जमावाकडून तोडफोड करण्यात आली.
अजित डोवाल यांनी घेतली शेख हसीनांची भेट
शेख हसिना यांनी बांगलादेश पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या भारतात दाखल झाल्या आहेत. शेख हसिना काही दिवस दिल्लीतच राहण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली आणि चर्चा केली. भारतीय हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांकडून हसीना यांना संरक्षण देण्यात आलं आहे.
कोण आहेत मोहम्मद युनूस?
मोहम्मद युनूस यांना जगातील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मोहम्मद युनूस हे सामाजिक कार्यकर्ते, बँकर आणि अर्थतज्ज्ञ आहेत. चितगाव विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केली आणि गरजूंना छोटी कर्जे देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांनी बांगलादेशात ग्रामीण बँकेची स्थापना केली. खेड्यातील लोकांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना बँकिंग व्यवस्थेमध्ये सामावून घेतल्याबद्दल युनूस यांना 2006 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
मोहम्मद युनूस यांना केवळ नोबेल पुरस्कारानेच नव्हे तर युनायटेड स्टेट्स प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमनेही गौरवण्यात आले आहे. 2012 मध्ये त्यांना स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठात कुलपतीपद देण्यात आले.
ही बातमी वाचा: