निवडणूक लवकर न झाल्यास गृहयुद्ध होईल, इम्रान खान यांच्या पक्षाचा शाहबाज यांना अल्टिमेटम
Pakistan: पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरु होऊ शकते, अशी शक्यता पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी वर्तवली आहे.

Pakistan: पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरु होऊ शकते, अशी शक्यता पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी वर्तवली आहे. ते म्हणाले आहेत की, इम्रान खान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भेटण्यास तयार आहेत. त्यांना शरीफ यांना भेटून देशात लवकरच निवडणूक घेण्याबाबत चर्चा करायची आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष मे महिन्याच्या अखेरीस इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढेल आणि निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध होऊ शकते. इम्रान खान यांनी अलीकडेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
सैन्यासोबत झाले गैरसमज
रशीद पुढे म्हणाले की, ते पीटीआय आणि लष्करामधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच मी लष्करासोबत शांततेच्या बाजूने आहे. पण युद्ध झाल्यास मी इम्रान खान यांच्या पाठीशी उभा राहीन, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, लष्कराने लोकशाही बळकट होण्यासाठी काम केलं पाहिजे आणि ती टिकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुदतपूर्व निवडणुका. निवडणुका लवकर झाल्या नाहीत तर शाहबाज शरीफ यांचे सरकार टिकणार नाही.
गृहयुद्धाची धमकी?
रशीद यांनी कबूल केले की, इम्रान खान यांच्या कार्यकाळात काही अडचणी आल्या, ज्यामुळे बलुचिस्तान अवामी पार्टी (बीएपी), मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-क्यू (पीएमएल-क्यू) सारखे मित्र पक्ष आमच्यापासून वेगळे झाले. त्यांनी सांगितले आहे की, इम्रान खान इस्लामाबादमध्ये पक्षातील लाखो लोकांना एकत्र बोलावणार आहेत. यामुळे देशात अनिश्चित परिस्थिती तयार होईल, ज्यामुळे गृहयुद्ध होऊ शकते. आमची एकच मागणी आहे, देशात लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की, आम्हाला शाहबाज सरकार पडायची नाही, परंतु सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केल्याशिवाय मोर्चेकर्ते इस्लामाबादमधून परतणार नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या:
- बर्लिनमध्ये पंतप्रधान मोदींना देण्यात आलं 'गार्ड ऑफ ऑनर', जर्मनीच्या चॅन्सेलरची घेतली भेट
- 'युद्धाने कोणताही देश जिंकत नाही', रशिया-युक्रेन युद्धाबाबत पंतप्रधान मोदी यांचा वक्तव्य
- Russia Ukraine War : रशियाला आणखी एक झटका, दोन जहाज नष्ट केल्याचा युक्रेनचा दावा
- कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी पुतिन जाणार रजेवर, राष्ट्राध्यपदाची जबाबदारी सांभाळणार 'हा' नेता























