(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'युद्धाने कोणताही देश जिंकत नाही', रशिया-युक्रेन युद्धाबाबत पंतप्रधान मोदी यांचा वक्तव्य
Russia-Ukraine War: तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धात कोणीही जिंकणार नाही.
Russia-Ukraine War: तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धात कोणीही जिंकणार नाही. चर्चेतून समस्येवर तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास असल्याचं ते म्हणाले आहेत. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर चर्चा केली. युक्रेनमधील संघर्षात कोणाचाही विजय होणार नाही. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत आणि युद्ध संपवण्याचे आवाहन करतो. याआधी रविवारी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी रशिया-युक्रेन युद्धावर भारताची बाजू घेताना दोन्ही देशांनी शत्रुत्व संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि चर्चेतून हे प्रकरण सोडवले पाहिजे, असे म्हटले होते.
विनय मोहन क्वात्रा म्हणाले होते की, युक्रेनबाबत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. दोन्ही देशांनी युद्ध थांबवून चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा, असे आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहोत. ते म्हणाले की, भारताच्या मित्र राष्ट्रांनाही रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताचे मत माहित आहे आणि त्यांनी यासाठी भारताचे कौतुक हे केले आहे. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत रशिया आणि युक्रेनला युद्ध थांबवून चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन सातत्याने करत आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताने अनेक जागतिक व्यासपीठांवरून आपली भूमिका मांडली आहे आणि आजही भारत त्याच भूमिकेवर कायम आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. कीवने दावा केला आहे की, 2 मे पासून युद्ध सुरू झाल्यापासून 23,800 रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करून हा दावा केला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियाने युद्धात आतापर्यंत 194 विमाने, 155 हेलिकॉप्टर, 1048 टँक, 271 यूएव्ही ऑपरेशनल, 38 विशेष उपकरणे, 1824 वाहने आणि इंधन टाक्या गमावल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी पुतिन जाणार रजेवर, राष्ट्राध्यपदाची जबाबदारी सांभाळणार 'हा' नेता
बर्लिनमध्ये पंतप्रधान मोदींना देण्यात आलं 'गार्ड ऑफ ऑनर', जर्मनीच्या चॅन्सेलरची घेतली भेट