Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
Kolhapur Crime : परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं (Local Crime Branch Kolhapur) 12 तासाच्या आत जेरबंद केलं. सोमवारी रात्री 12 वाजता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सात चोरट्यांनी आराम बसच्या क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून गाडी थांबवण्यास भाग पाडले होते. त्यानंतर जवळपास 1 कोटी 22 लाखाचे चांदी आणि सोने आणि काही पार्ट्स चोरले (Kolhapur Robbery Case) होते. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलिसांनी टीम तयार केली आणि 12 तासाच्या आत दरोडा टाकणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं. त्याचसोबत चोरलेला 1 कोटी 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
ही घटना 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका आराम बसमध्ये घडली होती. पार्सलद्वारे नेण्यात येणारा मौल्यवान मुद्देमाल अडवून आरोपींनी वाहन चालकाला मारहाण करत जबरी चोरी केली होती. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नियोजनबद्ध पद्धतीने चोरी (Robbery Modus Operandi)
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी वाहनाचा पाठलाग केला. योग्य संधी साधत त्यांनी वाहन अडवले. चालकावर हल्ला केला आणि चांदी, सोने तसेच मोबाईल स्पेअर पार्ट्सने भरलेले पार्सल जबरदस्तीने हिसकावून नेले. हा गुन्हा पूर्णतः नियोजनबद्ध असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहिती ठरली महत्त्वाची (Police Intelligence)
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी अक्षय कदम (रा. विकमनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आणखी सहा साथीदारांना अटक करण्यात आली.
पोलिसांची जलद कारवाई, नागरिकांकडून कौतुक (Swift Police Action)
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
ही बातमी वाचा:
























