राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
गेल्या चार-पाच दिवसांपासून पिंपरी चिंचवड विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू होती. आता ही चर्चा खरी ठरत असल्याचं बोललं जात आहे.

Pune: राष्ट्रवादी शरद पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे विधानसभा लढवलेले उमेदवार आणि माजी नगरसेवक राहुल कलाटे (Rahul Kalate) आज भाजप प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधील पदाधिकाऱ्यांनीच मोठा विरोध केला होता. मात्र स्थानिक नेत्यांच्या विरोधाला नजुमानता ते आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पिंपरी चिंचवड विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू होती. आता ही चर्चा खरी ठरत असल्याचं बोललं जात आहे.
राहुल कलाटे यांनी 2024 मध्ये भाजपचे चिंचवडमधील आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महापालिका गटनेते म्हणून कलाटे यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती.
भाजप कार्यकर्त्यांचा कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध झाला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून 25 क्रमांकाच्या प्रभागासाठी राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटल्याने भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता.भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगतापांच्या (Shankar Jagtap) विरोधात लढलेल्या कलाटे यांचा प्रचार आम्ही कसा काय करायचा?, असा सवाल या नाराजांनी उपस्थित केला आहे. भाजपचे वरिष्ठ आमच्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. असं झालं तर आम्ही त्यावेळी वेगळी भूमिका घेऊ, असा निर्वाणीचा इशारा भाजपमधील इच्छूक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता. पिंपरी चिंचवड शहरात भाजप विस्ताराचा प्रयत्न करत असला तरी आयात उमेदवारांमुळे कार्यकर्ते दुखावले जात असल्याची ही चर्चा आहे.























