बर्लिनमध्ये पंतप्रधान मोदींना देण्यात आलं 'गार्ड ऑफ ऑनर', जर्मनीच्या चॅन्सेलरची घेतली भेट
PM Modi Europe Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत.
PM Modi Europe Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. या वर्षी पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. अशातच आज (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले. विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथील हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधला. यावेळी जर्मनी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलं. यानंतर त्यांनी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांची भेट घेतली. शोल्झ हे चॅन्सेलर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांची ही पहिलीच भेट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर्मन लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. पंतप्रधान मोदी आणि जर्मन चॅन्सेलर यांच्यात बैठक ही झाली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीत परस्पर संबंध आणि व्यापार वाढविण्यावरही चर्चा झाली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली.
यानंतर पंतप्रधान मोदी सहाव्या भारत-जर्मनी आंतरसरकारी सल्लागार IGC चे सह-अध्यक्षपद भूषवतील. हा एक खास कार्यक्रम आहे, जो भारत फक्त जर्मनीसोबत करतो. IGC ची सुरुवात 2011 मध्ये झाली. ही एक विशेष द्विवार्षिक यंत्रणा आहे, ज्यात दोन्ही देशांच्या सरकारांना द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करून संमती बनवण्याची संधी मिळते. या कार्यक्रमात दोन्ही देशांचे अनेक मंत्रीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील सहभागी होणार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध मजबूत करण्याची भविष्याची ब्लू प्रिंट तयार होईल. विशेष म्हणजे बर्लिननंतर पंतप्रधान 3 मे रोजी डेन्मार्कला भेट देतील. जिथे ते डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा करतील. येथे ते दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी फ्रान्सला भेट देणार. जेथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील.