(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बँकेत मास्क घालायची विनंती केल्याने 5.8 कोटी रुपयांच्या नोटा काढल्या अन् बँकवाल्यांना मोजायला लावल्या
बँकेत आल्यानंतर फक्त मास्क घालायला सांगितल्याने चीनमधल्या एका लक्ष्याधीश व्यक्तीने असा विक्षिप्त निर्णय घेतला.
बीजिंग : काही माणसं किती विक्षिप्तपणा करतील आणि काय करतील याचा काही नेम नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीला जर पैशाचा माज असेल तर मग काय सांगायलाच नको. दुसऱ्याला धडा शिकवायच्या नादात आपलं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण ती गोष्ट करणारच असा काहीसा पवित्रा घेतला जातो. चीनमध्येही असंच काहीसं घडलंय. बँकमध्ये गेल्यानंतर केवळ मास्क लावा असं सांगितल्याने एक नागरिकाचा पारा चढला आणि त्याने चक्क 5.8 कोटी रुपयांच्या नोटा काढल्या. त्या नोटा त्याने बँकेतल्या कर्मचाऱ्यांना मोजायला लावल्या.
बँक ऑफ शांघाय मधील एका सुरक्षा रक्षकाने मास्क लावा असं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला अपमान झाल्यासारखं वाटलं आणि त्याच्या संतापाचा पारा वाढला. मग त्याने या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं आणि लागोलाग आपल्या खात्यावरचे 5 लाख युआन म्हणजे 5.8 कोटी रुपये काढले, तेही नोटांच्या स्वरुपात. मग त्या नोटा बँकेतल्या कर्मचाऱ्यांना मोजायला लावल्या. तरी बरं, बँक ऑफ शांघायमध्ये एका व्यक्तीला एकाच वेळी फक्त 5.8 कोटी रुपये काढता येतात. नाहीतर या व्यक्तीने अजूनही रक्कम काढली असती आणि त्या नोटा बँकेतल्या कर्मचाऱ्यांना मोजायला लावल्या असत्या. रागाच्या भरात त्या व्यक्तीने असं ठरवलं होतं की, रोज त्या बँकेत जायचं आणि मोठी रक्कम काढायची. नंतर त्या सर्व नोटा बँक कर्मचाऱ्यांना दिवसभर मोजायला लावायच्या.
त्या विक्षिप्त व्यक्तीने आपल्यासोबत बँक कर्मचाऱ्यांनी दुर्व्यवहार केल्याचा आरोप केला. बँक कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी कशा प्रकारे वागायचं याची सभ्यता नसल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं त्याने कबुल केलं. आपली सर्व सेव्हिंग त्या बँकेतून काढली आणि दुसऱ्या एका बँकेत भरल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :