(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amazon Forest Rescue: अन् जगणं नशिबातच होतं! अॅमेझॉनच्या जंगलात 40 दिवसांनी सुरक्षित सापडली मुलं, नक्की काय घडलं?
Amazon Forest Rescue: कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले की, 'जेव्हा मुलांना जंगलात शोधण्यात आले तेव्हा मुलं एकटी होती.' तसेच सध्या या मुलांवर उपचार सुरु आहेत.
Amazon Forest Rescue: अॅमेझॉनच्या जंगलात (Amazon Forest) चार मुलांना सुखरुप शोधण्यात यश आले आहे.जंगालात सापडलेल्या या मुलांची स्थिती अत्यंत नाजून आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून त्यांच्या शरीरावर अनेक जखमा देखील आहेत. कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने चार मुलांना अॅमेझॉनच्या जंगलातून सुखरुप शोधून काढले. ही मुलं 40 दिवसांपूर्वी झालेल्या विमान अपघातात अडकली होती.
नेमकं काय घडलं?
अॅमेझॉनच्या जंगलात 1 मे रोजी एका विमानाचा अपघात झाला होता. या विमानात सहा यात्रेकरुंसह एक पायलट देखील होता. विमानाच्या इंजिमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने अॅमेझॉनच्या जंगलात या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरित लोकांना शोधून काढण्यासाठी अॅमेझॉनच्या जंगलात कोलंबिया सरकारकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली. यामध्ये चार मुलांना शोधण्यात यश आले कोलंबियाच्या सैन्य अधिकाऱ्यांना यश आले आहे. अॅमेझॉनच्या जंगलातून वाचवण्यात आलेल्या मुलांची वयं ही 13,9 आणि 4 अशी आहेत. तर यामध्ये एका नवजात बालकाचा देखील समावेश आहे.
¡Una alegría para todo el país! Aparecieron con vida los 4 niños que estaban perdidos hace 40 días en la selva colombiana. pic.twitter.com/cvADdLbCpm
— Gustavo Petro (@petrogustavo) June 9, 2023
40 दिवसांपासून सुरु होती शोध मोहिम
राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी म्हटले की, 'या मुलांना शोधण्यासाठी गेल्या चाळीस दिवसांपासून बचाव कार्य सुरु होते. यासाठी आमच्या सरकारने कठोर परिश्रम देखील घेतले आहेत.' राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, 'जेव्हा मुलांना जंगलातून शोधून काढले तेव्हा ही मुलं एकटीच होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.' विमान अपघाताची घटना 1 मे रोजी झाली होती. विमानमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हा विमान अपघात झाल्याची माहिती राष्ट्रपती पेट्रो यांनी दिली.
राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी ट्विट करत जंगलातील या मुलांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये सैन्याचे लोक घनदाट जंगलात या मुलांची काळजी घेताना दिसत आहे.अॅमेझॉन सारख्या घनदाट जंगलातून मुलांना सुखरुप शोधून काढणं हे कोलंबिया सरकारचं आणि सैन्याचं यश मानवं लागेल. या मुलांच्या कुटुंबियांनी मुलांना तात्काळ भेटण्याची मागणी देखील आता सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता कुटुंबियांची आणि या मुलांची भेट कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.