''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
लाडकी बहीण योजनेवर सभागृहात सावत्र भावाप्रमाणे वागणारे विरोधक गावोगावी बहिणींचे सख्खे भाऊ असल्याचा आव आणत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) सध्या राज्यात चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेवरुन राजकारणही चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत आहेत. महायुतीच्या मेळाव्यातून भाषण करताना तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेवर भाषण केलं. ही योजना लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचवण्याचं आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं आहे. विशेष म्हणजे या योजनेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही विरोधकांना टोला लगावला. आता, पुन्हा एकदा या योजनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर निशाणा साधला.
लाडकी बहीण योजनेवर सभागृहात सावत्र भावाप्रमाणे वागणारे विरोधक गावोगावी बहिणींचे सख्खे भाऊ असल्याचा आव आणत आहेत. गावोगावी ह्यांचेच लोकं फॉर्म घेऊन उभे आहेत, असे म्हणत विरोधकांच्या हुशारीवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला होता. आता, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. या योजनेवरुन प्रश्न विचारताना, बहीण-भावांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम तुम्ही करत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं.
युवकांसाठी काय योजना?
महिलांसाठी योजना आणली त्याचं मी स्वागत करतो, पण युवकांसाठी काय योजना आहे. आजही शेतकरी आत्महत्या करतात, त्या घरातील वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची जी योजना आहे, त्यामध्ये तो दिवा पेटू शकणार आहे का?. बेकारांचे तांडेच्या तांडे रस्त्यावर फिरत आहेत, आणि तुम्ही महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवत आहात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या योजनात्मक धोरणांवर टीका केली.
बहीण-भावांमध्ये वितुष्ट आणताय
तुम्ही जी योजना आणलीय, सगळीकडे महिलांची गर्दी उसळलीय. चांगली गोष्ट आहे, पण त्यात घरामध्ये बहीण-भावामध्ये तुम्ही वितुष्ट आणताय. कारण, भाऊ बेकार फिरतोय, मुलीला मोफत शिक्षणाची सोय केली, मग मुलांनाही करा. दोघांमध्ये असा भेदभाव करू नका, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तुम्ही राजकारणात घरं फोडणारी माणसं आहात, आमचं घर फोडलं. पवारांचं कुटुंब फोडलं, पक्ष फोडला, आता जनतेचं कुटुंब तुम्ही फोडताय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकावर हल्लाबोल केला. दरम्यान, घराघरामध्ये तुम्ही हे वितुष्ट आणत आहात, करायचं आहे तर सगळ्यांसाठी करा, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
हेही वाचा
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती