(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : वर्ध्यात शेतकऱ्यानं पिकवला काळा गहू, किलोला मिळतोय 70 रुपयांचा दर
Black Wheat : वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न (Black Wheat Production) घेतले आहे.
Black Wheat Production : राज्याच्या विविध भागातील शेतकरी (Farmers) सातत्यानं नवनवीन प्रयोग करत आहेत. तसेच पारंपारिक पिकांना बगल देत पिक पद्धतीत बदल करत आहेत. वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न (Black Wheat Production) घेतले आहे. विदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात असले तरी या गव्हाचे फायदे खूप जास्त असल्यानं नागरिक बाहेरुन हा गहू विकत आणतात. राजेश डफर यांनी एक एकर शेतात 18 क्विंटल इतक्या काळ्या गव्हाचं उत्पादन घेतलं आहे.
एक एकरात 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन
काळा गहू आपल्या शरीरासाठी चांगला असल्याचे राजेश डफर यांनी गुगलवर वाचले होते. या गव्हाचे फायदे मोठ्या प्रमाणात असल्यानं त्याची लागवड करण्याची त्यांना मानसिकता तयार केली आहे. काळ्या गव्हाचे बियाणे कुठे मिळतात याचा त्यांनी शोध सुरु केला. या काळ्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यानं पोटाचे विकार होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्यांना आकोट इथे काळ्या गव्हाचे बियाणे मिळाले. त्यांनी सुरुवातीला 40 किलो बियाणे आणून त्याची एक एकर शेतीमध्ये पेरणी केली. आश्चर्य म्हणजे एक एकरात त्यांना 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन झाले. सध्या बाजारात काळ्या गव्हाला किलोला 70 रुपयांचा दर मिळत आहे.
काय आहेत काळ्या गव्हाची वैशिष्ट्ये?
काळा गहू हा बहुगुणी आहे. त्याचे औषधी गुणधर्म आहेत. कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींमध्ये गहू उपयुक्त आहे. याशिवाय काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिड असतात. त्यामुळं या गव्हाचे पोषणमूल्य अधिक आहे. समृद्ध पौष्टिक आणि सकस आहारात त्याचा समावेश करता येतो. अॅन्थोसायनीन (140 पीपीएम) या घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळं हा गहू काळा असतो.
काळ्या गव्हामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढवते
अॅन्थोसायनीन हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढवते. ब्लूबेरी, जांभूळ या फळांमध्ये अॅन्थोसायनीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळं या फळांचा रंग काळपट जांभळा असतो. अॅन्थोसायनीनमुळं फळांची पौष्टीकता वाढते. परंतु, जांभूळ आणि ब्लूबेरी वर्षभर उपलब्ध नसतात. काळ्या गव्हामुळं ही पौष्टीकतत्वे रोजच्या आहारातून अगदी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळं वर्धा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने काळ्या गव्हाची लागवड करुन आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून चांगली कमाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: